संजय खांडेकरअकोला, दि. १८- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे टपाल तिकीट काढण्यास राज्याच्या युती शासनाकडे पैसा नाही, असे पत्र समान्य प्रशासन विभाग मंत्रालयाचे अवर सचिव र. ग. पांचाळ यांनी पाठविल्याने शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर निष्ठा ठेवणार्या नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २0१२ रोजी निधन झाल्यानंतर राज्यभरात शोककळा पसरली होती. १८ नोव्हेंबर रोजी निघालेल्या अंत्ययात्रेत बाळासाहेबांवर प्रेम करणार्या शोकाकुल नागरिकांनी मुंबई थबकली होती. अकोला महापालिकेच्या नगरसेविका अँड. धनश्री अभ्यंकर-देव यांनी तत्कालीन केंद्रीय माहिती व संचार मंत्री कपिल सिब्बल आणि राज्य शासनाकडे बाळासाहेबांवर टपाल तिकीट काढण्याची मागणी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर देशात आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. नगरसेविका धनश्री अभ्यंकर-देव यांनी टपाल तिकिटासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला. युती सरकारच्या काळात हे टपाल तिकीट निघेल ही अपेक्षा होती; मात्र महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव पांचाळ यांनी शासनाकडे आर्थिक तरतूद नसल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. ज्या व्यक्तींची जन्मशताब्दी किंवा शंभरावी पुण्यतिथी असेल अशाच व्यक्तींवर शासनानडून टपाल तिकीट काढण्यासाठी आर्थिक तरतूद असल्याचेही त्यांनी अँड. देव यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तमाम शिवसैनिकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टपाल तिकीट काढण्यासाठी राज्याच्या युती शासनाकडे पैसा नसेल तर शिवसेना खासगी खर्चातून बाळासाहेबांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी टपाल तिकीट काढेल, असे मत याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख अतुल पवनीकर यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना नोंदविले.- केंद्र शासनाची किंवा पोस्ट विभागाची योजना असेल तर असे अवर सचिवांनी महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या भावना समजून जबाबदारीने पत्र पाठवायला हवे होते. याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर बोलता येईल. - दिवाकर रावते, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य.
बाळासाहेबांवर टपाल तिकीट काढण्यास राज्यशासनाकडे पैसा नाही !
By admin | Published: November 19, 2016 2:01 AM