मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विभागाकडून 2020 - 21 पुरस्कार सन्मान सोहळा बुधवारी पार पडला. महाराष्ट्रातील बालगृहातून वाढलेल्या मुलांना प्राप्त परिस्थितीशी सामना करत कोणत्याही प्रकारचे आर्थिक सामाजिक पाठबळ नसताना आपले जीवन यश्वस्वी केले. वेळप्रसंगी उपाशी राहून तर हॉटेलमध्ये दुकानात नोकरी करत आपले आयुष्य यशस्वी केलं आहे. समाजातील मुलासमोर आदर्श निर्माण केला अशा महाराष्ट्रातील 33 मुलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ओणी येथे कार्यरत असलेल्या वात्सल्य मंदिर या संस्थेतील 6 मुलांचा गौरव करण्यात आला. ही रत्नागिरी जिल्हासाठी अभिमानास्पद बाब आहे.
गेले 40 वर्ष समाजातील अनाथ, निराधार, काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांसाठी बालकाश्रम वात्सल्य मंदिर, ओणी चालवत आहे. आजपर्यत 235 मुले शिक्षण पूर्ण करून संस्थेतून बाहेर पडली आहेत. त्यापैकी काही मुले पदवी शिक्षण घेऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत. काही मुले इंजिनिअरिंगची पदवी/ पदविका घेऊन बाहेर पडले आहेत. काही मुलांनी खेळात राष्ट्रिय स्तरावर चमक दाखवली आहे. काही पोलिस, कमांडो, शिक्षक, वकील, मूर्तीकार, चित्रकार तर संस्थेतील एका विद्यार्थ्याने रसायन शास्त्रात डॉक्टरेट पदवी घेऊन संशोधन करत आहे. अशा विविध क्षेत्रात मुले समाजात प्रत्यक्ष काम करत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विभागाकडून 2020-21 पुरस्कार सन्मान झालेले विद्यार्थी
1. विजय सराटे
एम. एस. डब्ल्यू ही पदवी प्राप्त करून बालगृहातील मुलीशी विवाह करून आज नालासोपारा येथे नारायण ट्र्स्ट तर्फ़े बालकाश्रम, वृध्दाश्रम व नोकरी करणा-या स्त्रीयांसाठी वस्तीगृह गेले 15 वर्ष सातत्याने चालवत आहेत.
2. संजय सराटे
बी. एस्सी करून फ़िनोलेक्स कंपनीत काम करून इंडोनेशिया येथे काही काळ काम केले. रत्नागिरीत पहिला सायबर कॅफ़े सुरू करणारा हा विद्यार्थी.
3. महेशकुमार
कृषी पदवीका प्राप्त केल्यावर काही वर्ष संस्थेसाठी दिल्यावर शासकिय नोकरीत दाखल नोकरी करतच एम. ए. पदवी पूर्ण केली तसेच बीएस्सी. अँग्री करून कृषी अधिकारी म्हणून सेवेत दाखल आहेत.
4. गाँडफ्री फर्नांडीस
10 वीला अपेक्षीत यश मिळालेले नाही. तरी ही खचून न जाता जिद्दीने सायन्स विभागाकडे प्रवेश मिळवून पुढे रसायन शास्त्रात चांगल्या प्रकारे यश मिळ्वून जगमान्य अशा I.C.T. या संस्थेतून रसायन शास्त्रात पी. एच.डी. केली.
आजही त्याच संस्थेत मार्गदर्शक व शासकीय कंपनीचा सल्लागार म्हणून कार्यरत आहे. वात्सल्य मंदिर संस्थेच्या कार्यकारणी सभासद आहे. आजपर्यत 4 पेटंट नावावर आहेत.
5. अभय तेली
बी. ए. शिक्षण पूर्ण करून पोलीस म्हणून भरती झाला. तिथेच न राहता स्वतःच्या जिद्दीवर व कष्टावर राज्य शासनाच्या एफ़ वन फ़ोर्स मध्ये कंमांडो म्हणून कार्यरत पुढे एम. ए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. अनाथ मुलांच्या समस्या निवारण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
6. वैभव कोळेकर
10 वी नंतर सावर्डे येथे आर्ट महाविद्यालयात 4 वर्ष पदवी घेतली. त्या कालावधीत त्याच्या कलेला मुंबई येथील जहांगीर आर्टमध्ये राष्ट्रीय पारितोषिक मिळविले. चीन मध्ये मकाव बेटावर दीड वर्ष काम केले. सद्या देशातल्या विविध ठिकाणी आपला व्यवसाय करत आहे. काम करत असताना स्वतः बरोबर इतर 20-25 मुलांना रोजगार दिला आहे.
अशा प्रकारे बालकाश्रमात राहून गगण भरारी घेऊन विषेश प्राविण्य मिळाविलेल्या 32 विद्यार्थ्यांचा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान होणे म्हणजे संस्थेच्या मानात रोवलेला तुराच जणू. महाराष्ट्र शासनाने गौरव करून फ़क्त लढ म्हणा अस दिलेलं पाठबळ हेच संस्थांना शंभर हत्तीच बळ निर्माण करून देणारं आहे अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन यांनी दिली आहे.