ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - तेल कंपन्यांनी सोमवारी रात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली पण त्याचा महाराष्ट्रातील वाहन चालकांना फायदा होणार नाहीय. कारण पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होताच महाराष्ट्र सरकारने महसूल वाढवण्यासाठी इंधनावरील सरचार्ज एक रुपयांनी वाढवला आहे. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये दोन रुपयांनी घट झाली असली तरी, महाराष्ट्रात प्रत्यक्षात फक्त 1 रुपयांचीच घट झाली आहे.
सोमवारी रात्री तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत प्रती लीटर 2 रुपये 16 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत प्रती लीटर 2 रुपये 10 पैशांनी कमी केल्या होत्या. राज्यसरकारने मंगळवारी रात्री इंधनावर एक रुपया सरचार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही सुरु केली.
त्यामुळे या दर कपातीची महाराष्ट्रातील वाहन चालकांना फायदा होणार नाहीय. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल नियंत्रण मुक्त केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी-जास्त करत असतात. 1 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचित वाढ करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलच्या किंमतीत 1 पैसा तर डिझेलच्या किंमतीत 44 पैशांची वाढ करण्यात आली होती. 16 एप्रिल रोजी पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपये 39 पैसे प्रती लीटर तर डिझेलच्या किंमतीत 1 रूपया 4 पैशांची वाढ झाली होती.