मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून पूर्णपणे ओसरला नसल्याने राज्य सरकारने येत्या १९ फेब्रुवारीला साजऱ्या होत असलेल्या शिवजयंतीसाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यंदा शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.शिवजयंती गड-किल्ल्यांवर साजरी न करता ती घरातच साधेपणाने साजरी करावी. जयंती उत्सवावेळी १० पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. प्रभातफेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढू नयेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सचे पालन करावे. ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी, असे गृह विभागाने आपल्या नियमावलीत म्हटले आहे.राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून ओसरलेला नाही. कोरोना संसर्गाची भीती अद्यापही कायम आहे. हे लक्षात घेऊन गृह विभागाने ही नियमावली तयार केली आहे.
यंदा शिवजयंती साधेपणाने होणार साजरी; राज्य सरकारकडून नियमावली जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 4:09 AM