लातूर - राज्य सरकार घोषणांच्या पलिकडे काहीच करीत नाही. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करीत नाही. कुठल्याही शेतमालाला आधारभूत किंमत दिली जात नाही. एकंदरित, या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडले आहे, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचे जिल्ह्यात शुक्रवारी आगमन झाले. त्यानिमित्ताने अजित पवार हे लातुरात आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते नवाब मलिक, आ. विक्रम काळे, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष मकरंद सावे आदींची उपस्थिती होती. अजित पवार म्हणाले, कापसाला भाव नाही. बोंडअळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. शेतक-यांकडील कापूस संपल्यानंतर भाव वाढले. त्याचा फायदा व्यापा-यांना होत आहे. कर्जमाफीची घोषणा झाली. पण त्याचा प्रत्यक्ष लाभ होताना दिसून येत नाही. ज्या शेतक-यांनी कर्जाची वेळेवर परतफेड केली, त्यांना जाहीर करण्यात आलेले २५ हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळत नाही. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. ओबीसी, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. एकंदरित, राज्यातील सत्ताधाºयांनी शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. शेजारील तेलंगणा राज्यात शेतक-यांना २४ तास मोफत वीज दिली जात आहे. पण आपल्या राज्यात शेतक-यांना ८ तास वीज हे सरकार देऊ शकत नाही. ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी ५० हजार रुपये मागितले जात आहेत, असा आरोपही अजित पवार यांनी केला. शेतकरी नडतो त्यावेळी सबुरीने घ्यावे लागते, ही इच्छाऱ्यांना वीज बिले दिली जात आहेत, असाही आरोप पवार यांनी केला. राठोड कुटुंबाला लाखाची मदत औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शेतकरी शहाजी राठोड यांना कृषी पंपाचे ६० हजारांचे बिल देण्यात आले होते. त्यांनी महावितरणच्या कार्यालयात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या शेतक-याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. हे कुटुंब पिठाची गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह भागवीत आहे. या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना एक लाखाची मदत देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, असेही ते म्हणाले. कोरेगाव भीमा दंगलीचा मास्टरमार्इंड कोण?.. १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचा मास्टरमार्इंड शोधण्यात सरकारला अद्याप यश आले नाही. या घटनेतून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, याचा मास्टरमार्इंड कोण आहे, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. सोलर कृषी पंपाची योजना बंद... सरकारने शेतक-यांसाठी सोलरचे कृषी पंप देण्याची घोषणा केली होती. केवळ २२०० कृषी पंप देऊन ती योजना बंद करण्यात आली आहे. नागपूर समृद्धी महामार्गावरील शेतक-यांना पाचपट अधिक भाव देण्याची मागणी आम्ही केली आहे. कोणत्याही समस्याबद्दल, प्रश्नाबद्दल आम्ही अभ्यास करीत आहोत. चौकशी करू, एवढे ठराविक उत्तर सत्ताधाºयांकडून मिळत आहे, असेही अजित पवार म्हणाले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, अजित पवार यांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 5:52 PM