मुंबई : दोन्ही सभागृहांत शेतकरी कर्जमाफीची मागणी होत आहे. विरोधकांच्या जोडीने उद्धव ठाकरे यांनीही कर्जमाफीची मागणी केली आहे. त्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनाही कर्जमाफीवरुन सरकारच्या विरोधात गेल्याने राज्यातील सरकार अल्पमतात गेल्याचा दावा काँग्रेस सदस्य नारायण राणे यांनी केला. त्यामुळे सरकारने आधी विश्वासदर्शक ठराव संमत करावा आणि त्यानंतर अभिभाषणाबद्दल आभाराचा प्रस्ताव आणावा, असेही राणे म्हणाले. चर्चेवरच हरकत - धनंजय मुंडे राज्यपालांचे अभिभाषण आणि त्यावरील आभाराचा प्रस्ताव संवैधानिक नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडला. राज्यपालांचे अभिभाषण हे राज्य मंत्रिमंडळात सर्वानुमते तयार करण्यात येते. मात्र, काही महिन्यांपासून शिवसेना सातत्याने भाजपाविरोधात भूमिका मांडत आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत ते सरकारच्या विरोधात आहेत. त्यामुळे अभिभाषण त्यांना मान्य आहे का नाही याबाबत खुलासा व्हायला हवा. अडीच वर्षांपूर्वी राज्यात नवीन सरकार आले. तेंव्हा घाईगडबडीत विश्वासदर्शक ठराव संमत करण्यात आला होता. स्थानिक स्वराज संस्था निर्वडणूक प्रचारादरम्यान भाजपा आणि शिवसेनेने एकमेकांवर ज्या पद्धतीने टीका केली. ते पाहता पुन्हा एकदा विश्वासदर्शक ठराव मांडावा, अशी मागणी मुंडे यांनी केली. (प्रतिनिधी)
राज्य सरकार अल्पमतात; राणे, मुंडेंनी केली कोंडीे
By admin | Published: March 16, 2017 12:20 AM