मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात कुणाच्या दबावाखाली ट्विट केले होते का, याची चौकशी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाकडून करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी काँग्रेसला दिले.काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याशी झूमवर संपर्क करून ‘त्या’ ट्विटची चौकशी करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी प्रत्युत्तर दिले होते. त्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षयकुमार, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आदींचा समावेश होता. अक्षयकुमार आणि सायनाच्या ट्विटमधील शब्दन् शब्द सारखे आहेत. तर अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या ट्विटमध्ये मुंबई भाजपच्या उपाध्यक्षांचा उल्लेख केला आहे. या सेलिब्रिटींना भाजपने प्रवृत्त केले होते का, भाजपचा त्यांच्यावर दबाव होता का, या अनुषंगाने चौकशी व्हावी, अशी मागणी सावंत यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली होती. गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, शेतकरी आंदोलन शांततेत सुरू असताना ते बदनाम करण्याचे प्रयत्न केले गेले. भाजपवर टीका केली म्हणून सीबीआय, ईडीची चौकशी केली जाते. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले. त्यावर भारतीय सेलिब्रिटींनी कुणाच्या दबावाखाली ट्विट केले काय, याची चौकशी राज्य गुप्तवार्ता विभागामार्फत केली जाईल.भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाही. निषेध करावा तितका थोडाच. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मान्य करणारे यांचीच चौकशी झाली पाहिजे. - देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते