कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांत सवलत देण्याची मागणी व्यापारी वर्गाने लावून धरली आहे, तर लोकल प्रवासाची मुभा मिळावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंध ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले तरी शिथिलतेबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत असल्याचा दावा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.
कोरोना निर्बंधांतून हॉटेल, कापड उद्योगासोबतच व्यापारी वर्गाला कशा प्रकारे सुविधा द्यायच्या यावर सरकार विचार करत असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा केंद्र सरकारकडून मिळत नसल्यामुळे अनलॉकचा निर्णय पूर्णपणे अमलात येऊ शकत नसल्याचा आरोपही शेख यांनी केला आहे.