ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश करू देण्यास राज्य सरकारने पाठिंबा दर्शवला आहे. महिलांना दर्ग्यात प्रवेश देण्यास आपण अनुकूल आहोत, अशी भूमिका सरकारच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आली.
२०१२ मध्ये हाजीअली दर्ग्यात जाण्यापासून महिलांना मनाई करण्यात आली आहे. डॉ. नूरजहा साफीया नियाज व झाकीया सोमन यांनी या बंदीविरोधात याचिका केली होती. या दर्ग्यात मजारमध्ये जाण्यास महिलांना बंदी घालण्यात आली आहे. हे गैर असून राज्य घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा याने भंग होत आहे. मुंबईतील माहिम दर्ग्यासह इतर कोणत्याही दर्ग्यात मजारपर्यंत जाण्यास महिलांना बंदी नाही. तेव्हा हाजी अलीमध्ये घालण्यात आलेली बंदी उठवावी, अशी मागणी त्यांनी केली होती. अखेर याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता सरकारने महिलांच्या प्रवेशास पाठिंबा दर्शवला.