मुंबई: विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकण्यासाठी पोलीस आणि सरकारी वकिलांकडून कट रचण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. धाडी टाकणाऱ्यांना विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आदेश दिले. त्यासाठी खोटे पंच, खोटे साक्षीदार उभे करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गिरीश महाजन, संजय कुटे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मला अडचणीत आणण्यासाठी कट रचण्यात आले. त्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सगळे आदेश दिले. धाडी कशा टाकायच्या, चाकू कसे ठेवायचे, मोक्का कसा लावायचा, यासंदर्भात सगळ्या सूचना चव्हाण यांनी दिल्या. सरकारच्या मदतीनं हे कारस्थान शिजलं, असे धक्कादायक आरोप फडणवीस यांनी केले.
खोट्या तक्रारी करून खोटे साक्षीदार उभे करून विरोधकांना गोत्यात आणण्यासाठी कुभांड रचलं गेलं. विशेष सरकारी वकिलाच्या कार्यालयात विरोधकांच्या विरोधात कट शिजवण्यात आला. या प्रकरणात एफआयआर सरकारी वकिलांनीच लिहून दिला आणि साक्षीदारही दिला. या सगळ्या संभाषणांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. तब्बल सव्वाशे तासांचं फुटेज आहे. त्यावर २५ ते ३० भागांची वेब सीरिज निघेल आणि हे सगळं सत्य घटनेवर आधारित आहे, असा दावा फडणवीसांनी केला.
विरोधकांना संपवण्यासाठी त्यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्यामध्ये पोलिसांचा सहभाग असल्यानं याची चौकशी सीबीआयकडून व्हायला हवी, अशी मागणी फडणवीसांनी केली. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो असं आपण म्हणतो. ती परिस्थिती या सरकारमध्ये पाहायला मिळतेय, असं फडणवीस म्हणाले.