विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकार व्हीआयपींसाठी ९० कोटी रुपये किमतीचे नवे हेलिकॉप्टर खरेदी करणार असून, त्यासाठीची निविदा प्रक्रिया वर्षभरात पूर्ण केली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली आज या संदर्भातील उच्चाधिकार समितीची बैठक मंत्रालयात झाली. त्यात हेलिकॉप्टर खरेदीच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. हे हेलिकॉप्टर सर्वोत्कृष्ट असावे, असा प्रयत्न आहे. हेलिकॉप्टर खरेदीसाठी जागतिक निविदा मागविण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकारच्या सेवेत एक विमान असून, ते सुस्थितीत आहे. मात्र, सरकारच्या मालकीचे निलंगामध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर, तसेच बंद पडून असलेले अन्य एक हेलिकॉप्टर आणि एक बंद पडलेले दुसरे विमान यांची विक्री लवकर केली जाणार आहे. लातूरमधील दुर्घटनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुदैवाने बचावले होते. अलिबागमध्येही त्यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना टळली होती. सध्या व्हीआयपींसाठी कार्यरत असलेले सेस्रा सायटेशन एक्सएलएस या विमानासाठी एक वैमानिक आणि सहवैमानिकाची नियुक्ती लवकरच करण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीने घेतला. जुने हेलिकॉप्टर अन् विमान विक्रीलाराज्य शासनाच्या मालकीच्या एका विमानाचा वापर २००९ मध्ये बंद करण्यात आला, तर हेलिकॉप्टरचा वापर २०१० मध्ये बंद करण्यात आला. त्यांची विक्री अद्याप होऊ शकलेली नाही. त्यांच्या, तसेच अलीकडे दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरच्या विक्रीचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल आणि त्यात फारच कमी किंमत येणार असेल, तर ती एखाद्या संग्रहालयाला भेट देण्याचाही विचार होऊ शकतो.
राज्य सरकार व्हीआयपींसाठी ९० कोटींचे हेलिकॉप्टर खरेदी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 4:59 AM