नागपूर: सध्या राज्यात अनेक ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. या कायद्याबद्दल अनेकांच्या मनात भीती आहे. मात्र नागरिकांनी काळजी करू नये. त्यांच्या हितांचं आणि हक्कांचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार समर्थ आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. राज्यातल्या जनतेनं मनात कोणतेही गैरसमज ठेवू नये, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला.सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल अनेकांच्या मनात भीती आहे. या कायद्याबद्दल अनेक गैरसमजदेखील आहेत. त्यामुळे देशातच गैरसमजाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राज्यासह देशभरात कित्येकजण रस्त्यावर उतरले आहेत. काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटनादेखील घडल्या आहेत. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागेल, अशी कोणतीही कृती नागरिकांनी करू नये, असंआवाहन मी जनतेला करतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. कायदा लागू झाल्यास आपल्याला देश सोडावा लागेल, अशी भीती काहींना वाटते. मात्र कोणीही चिंता करू नये. राज्य सरकार जनतेच्या हितांचं आणि हक्कांचं संरक्षण करण्यास समर्थ आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली.
CAA Protest : नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करायला राज्य सरकार समर्थ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 5:48 PM