मुंबई : राज्य शासनाच्या मालकीच्या डॉल्फीन ए.एस. ३६५ एन-३ या जुन्या हेलिकॉप्टरची दुरुस्ती करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. त्यासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. नवीन हेलिकॉप्टर खरेदी केले असते तर १०० कोटींचा खर्च आला असता. दोन वर्षांपासून या हेलिकॉप्टरचा वापर बंद होता. शासनाने हे हेलिकॉप्टर एप्रिल २००१मध्ये २३ कोटी रुपयांना फ्रान्समधील युरो कॉप्टर कंपनीकडून खरेदी केले होते. सहा प्रवासी व दोन चालक अशी आसन क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरचा राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून १० वर्षे वापर झाला. त्यानंतर राज्य शासनाने नवीन हेलिकॉप्टर (सिर्कोस्की एस ७६ सी ++) डिसेंबर २०११मध्ये विकत घेतले. नवीन हेलिकॉप्टरचा वापर सुरू झाल्यामुळे २०११पासून जुन्या हेलिकॉप्टरचा वापर कमी झाला होता. उत्पादक कंपनीच्या नियमानुसार हेलिकॉप्टरने ५ हजार उड्डाणतास अथवा १० वर्षे पूर्ण केल्यास त्याची पूर्ण देखभाल व परीक्षण तपासणी करावी लागते. त्यासाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित असतो. ही तपासणी न झाल्याने जुने हेलिकॉप्टर वापरात नव्हते. जुने हेलिकॉप्टर दुरुस्तीनंतर १० ते १५ वर्षे वापरता येईल. तसेच त्यामुळे राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी भाड्याने हेलिकॉप्टरची सुविधा पुरविण्याकरिता कराव्या लागणाऱ्या सुमारे ८ कोटी रुपये इतक्या खर्चात बचत होईल, अशी सूचना मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मांडण्यात आली होती. (विशेष प्रतिनिधी)
राज्य शासन जुने हेलिकॉप्टर दुरुस्ती करून वापरणार
By admin | Published: January 20, 2016 2:29 AM