ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - देशद्रोहासंदर्भात महाराष्ट्र सरकारने जारी केलेले वादग्रस्त परिपत्रक मागे घेतल्याचे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला आज सांगितले. या परिपत्रकावरुन राज्य सरकारवर प्रचंड टीका करण्यात आली होती.
महाराष्ट्र सरकारने राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधींच्या विरोधात टीका केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम '१२४ अ' अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा आशयाचे परिपत्रक जारी केले होते. या विरोधात कार्टुनिस्ट असिम त्रिवेदी आणि नरेंद्र शर्मा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सरकारची बाजू मांडण्यासाठी एक आठवड्याची मुदत सरकारी वकीलांनी मागितली होती.
दरम्यान, आज सरकारने देशद्रोहासंदर्भात जारी करण्यात आलेले वादग्रस्त परिपत्रक मागे घेत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले.