लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजासह लिंगायत, धनगर व मुस्लीम समाजांनादेखील आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, या जरांगे यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. आरक्षणाच्या मागणीवरून दोन वर्गात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. मनाेज जरांगे, छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्याशी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढावा. चर्चेला आम्हालाही बाेलवावे, असा उपाय शनिवारी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी येथे सुचवला.
शरद पवार यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये हाेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्यामागे तुमचा हात असल्याची चर्चा आहे, हे खरे आहे काय? या प्रश्नावर पवार यांनी अतिशय मिश्किल उत्तर दिले. ते म्हणाले, किल्लारीत भूकंप झाला तेव्हाही या भूंकपामागे माझा हात असल्याची चर्चा होती! मराठवाड्याच्या २-३ जिल्ह्यांत काळजी घेण्याची गरज आहे. नामांतराच्या प्रश्नावर ज्यांची नाराजी होती, त्यांच्याशी संवाद साधून मी समेट घडवून आणला होता. आरक्षणाचा प्रश्न शक्यतो राज्यातच सोडवलेला बरा, असा सल्ला त्यांनी दिला.
लाडक्या योजनांमुळे अर्थव्यवस्थेचे काय?
राज्यातील महायुती सरकारकडून ‘लाडकी बहीण, लाडका भाऊ’ अशा लोकप्रिय योजना जाहीर केल्या जात आहेत. यावर खा. पवार म्हणाले, अशा योजनांना नरेंद्र मोदी रेवडी म्हणायचे. लाडकी बहीण योजनेचे एक-दोन हप्ते देऊन जनमत आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न दिसतो; पण यातून अर्थव्यवस्था मजबूत होईल काय? असा सवाल त्यांनी केला.
हा सूर्य आम्ही महाराष्ट्राच्या जेलात बघितला...
शरद पवार यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरात एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. गुजरात दंगलीतील तडीपारांच्या हातात आज देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना डिवचले होते. ‘अमित शाह यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर टीका करण्यासारखे आहे,’ असे ते म्हणाले होते. या अनुषंगाने पत्रपरिषदेत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, हा सूर्य आम्ही महाराष्ट्राच्या जेलात बघितला.
‘ती’ ठाकरे यांची वैयक्तिक भूमिका
आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर नेली पाहिजे, या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेशी आपण सहमत नाही. ठाकरे यांची ती वैयक्तिक भूमिका आहे. त्यावर एकमत नाही, अशी टिप्पणी खा. पवार यांनी केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे का? या प्रश्नावर उत्तर देण्याचे पवार यांनी टाळले.
आमचा जीव आरक्षणात अन् त्यांचा खुर्चीत : जरांगे
छत्रपती संभाजीनगर : आमचा जीव आरक्षणात तर सत्ताधारी आणि विरोधकांचा जीव खुर्चीत आहे. आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही त्यांची सत्ता येऊ देणार नाही. तुम्ही आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. विरोधक आणि सत्ताधारी हे उल्लू बनवतात, हे आता लोकांना समजजले आहे, असे ते म्हणाले.