पुणे : सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास बंदी असूनही त्याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र राज्यात आहे. केंद्र सरकारने घातलेली ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते. सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करणाऱ्यांमुळे स्मोकिंग न करणाऱ्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याच स्पष्ट झाले आहे.पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजेच स्वत: स्मोकिंग न करताही सिगारेटचा धूर श्वासावाटे शरीरात जाणाऱ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच ३० टक्के इतके असल्याचे नुकत्याच झालेल्या ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे इंडियाच्या अहवालातून समोर आले आहे. इतकेच नाही तर अॅक्टिव्ह स्मोकर्स हे १५ टक्के असून, पॅसिव्ह स्मोकर्स ३० टक्के असल्याने आरोग्याच्यादृष्टीने ही धोकादायक बाब असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. सिगारेटमुळे कॅन्सरच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत असून, सार्वजनिक ठिकाणी सिगारेट न ओढणारेही आपोआप कॅन्सरच्या जाळ्यात ओढले जातात. देशात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणा या राज्यांमध्ये पॅसिव्ह स्मोकिंग करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. कुटुंबामध्ये कुणी एखादा सिगारेट ओढत असेल तरी त्याच्यामुळे कुटुंबातील सर्वच सदस्य नकळत सिगारेट ओढत असतात. सिगारेट ओढणाऱ्यांना कॅन्सर होण्याचा किंवा हृदयाचे विकार होण्याचा धोका असतोच, परंतु सिगारेट न ओढणारेही नकळत सिगारेट ओढत असतात. त्यांच्या नाक आणि तोंडावाटे फुफ्फुसात सिगारेटचा धूर ओढला जातो. अनेकांना आपण पॅसिव्ह स्मोकिंगच्या केव्हा बळी जातो हे कळतही नाही. त्यामुळे एखाद्याला श्वसनाचा आजार झाला तर तो नेमका कशामुळे झाला याचे निदान करता येत नाही. (प्रतिनिधी)एक माणूस सिगारेट ओढत असेल तर त्याच्या आजूबाजूच्या दोन ते तीन जणांवर त्याचा परिणाम होतो. पॅसिव्ह स्मोकिंग हे अनेकदा अॅक्टिव्ह स्मोकिंगपेक्षाही हानीकारक ठरु शकते. सिगारेटचा धूर हा त्यातील तंबाखूमुळे होणारा आणि बाजूच्या कागदाचा अशा दोन प्रकारात असतो. पॅसिव्ह स्मोकिंगमध्ये कागदाचा धूर हा बाजूच्या व्यक्तींच्या शरीरात श्वासावाटे जातो, जो जास्त हानीकारक असतो. या धुरामुळे ब्रॉंकायटीस, फुफ्फुसांचा कर्करोग, न्यूमोनिया असे आजार होतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यावर असणारी बंदी काटेकोरपणे पाळली जायला हवी. - डॉ. संदीप साळवी, संचालक, चेस्ट रिसर्च फाउंडेशन
राज्यात अॅक्टिव्हपेक्षा पॅसिव्ह स्मोकिंग जास्त
By admin | Published: December 14, 2015 12:26 AM