शेगाव (जि. बुलडाणा) : देशापेक्षाही राज्यात जास्त असहिष्णू वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. विखे पाटील शनिवारी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते म्हणाले की, ‘देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण असून, कोणतीही बुद्धिवादी व्यक्ती असहिष्णुतेचा विरोधच करेल. जे साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ पुरस्कार परत करत आहेत, त्यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांना भाजपा सरकारने आवर घालण्याची गरज आहे.’ ‘राज्यातील युती सरकारने काँग्रेस—राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या योजनांची फक्त नावे बदलली आहेत. हे सरकार ‘गेम चेंजर’ नसून ‘नेम चेंजर’ आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजना आमच्या सरकारची होती. त्यांनी या योजनेला ‘जलयुक्त शिवार योजना’ असे नाव दिले. या योजनेचे २४ दलघमी पाणी नेमके कुठे अडविले, त्या गावांची यादी सादर करा. पाणी वाढले, तर ६५३ गावांमध्ये टँकर कसे सुरू आहेत, याचा जाब सरकारने द्यावा.’जलयुक्त शिवारात २४ दलघमी पाणी अडविल्याचा आणि सावकारी प्रकरणात फार मोठ्या कारवाया केल्याचा दावा मुख्यमंत्री करीत आहे. मात्र, याबाबत कागदपत्रे मागितल्यानंतर शासन ती लपवित असल्याचा आरोप विखे यांनी केला.नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ झाले, त्याची यादी आठ महिन्यांपासून मागणी करूनही देण्यात आलेली नाही, हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
केंद्रापेक्षा राज्यातच असहिष्णुता जास्त
By admin | Published: November 08, 2015 12:20 AM