मुंबई - राज्यातून आज ठिकठिकाणी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शिक्षकांच्या अचानक होणाऱ्या बदल्यांचा निर्णय अन्यायकारक असून तो निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीकडून मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
वाशिम, अमरावती, ठाणे, कोल्हापूर, नाशिक अशा विविध शहरातून आज मोर्चे निघाले. शनिवारी सकाळी शिक्षक समन्वय समितीच्या मोर्च्याला वाशिम येथील शिवाजी महाराज चौकातून सुरूवात झाली. या मोर्चात जिल्हयातीत शिक्षक नेत्यासह अनेकांनी हजेरी लावली. ठाण्यामध्ये वरिष्ठ श्रेणी निवडीच्या निर्णया विरोधात ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध केला.
अमरावतीमधूनही शनिवारी मोर्चा निघाला होता. वरिष्ठ व निवड क्षेणी संदर्भातील जाचक अट रद्द करण्यात यावी, शिक्षकांना करावा लागणारा सर्व्हेची ऑनलाइन कामं बंद करुन केंद्र पातळीवर डेटा ऑपरेटरसह सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या, तसंच 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जूनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.