आजपासून प्रारंभ: अधिवेशन वादळी ठरणार; दोन दिवस आरोप-प्रत्यारोप, गदारोळाचे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 05:57 AM2021-07-05T05:57:29+5:302021-07-05T05:57:47+5:30
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आठ अधिवेशनांमध्ये फक्त ३६ दिवस कामकाज चालले. तर, कोविड काळात जी अधिवेशने झाली त्यात फक्त १४ दिवसांचे कामकाज झाले. याच काळात संसदेच्या अधिवेशनांमध्ये ६९ दिवसांचे कामकाज झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. State Legislature session The convention will be stormy; Two days of accusations, rebellion!
मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून विरोधी पक्ष भाजपने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची महाविकास आघाडी सरकारने केलेली तयारी बघता अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अन् गदारोळाचेच वातावरण असेल, असे चित्र आहे. (State Legislature session Start today Two days of accusations, rebellion)
पुरवणी मागण्या आणि विधेयके हे कामकाज मुख्यत्वे यावेळी असेल. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक घेतलीच पाहिजे यासाठी काँग्रेस अडून बसली तरच निवडणूक होईल. ईडीची कारवाई, काही मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, मराठा व ओबीसी आरक्षण आदी मुद्द्यांवरून अधिवेशनात सत्तापक्ष व विरोधक आमनेसामने असतील.
दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन सरकारने लोकशाहीला कुलूप लावले असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी केला असून आता या सरकारविरुद्ध रस्त्यावरचीही लढाई लढू असे सांगितले. तर केवळ गोंधळातच अधिवेशन संपावे असे विरोधकांना वाटते. महाराष्ट्राच्या हिताची एवढीच काळजी असेल तर अधिवेशन शांततेत होऊ द्या असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी पत्रपरिषद घेतलीच नाही
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पत्रपरिषद घेतात ही परंपरा आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांना मुख्यमंत्री सडेतोड उत्तरे त्यातून देतात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तशी पत्रपरिषदच घेतली नाही. विरोधकांच्या प्रश्नांना आता थेट अधिवेशनातच उत्तर देण्याचा पवित्रा त्यांनी घेतलेला दिसतो.
कमीत कमी दिवस अधिवेशन, विरोधकांचा आरोप
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आठ अधिवेशनांमध्ये फक्त ३६ दिवस कामकाज चालले. तर, कोविड काळात जी अधिवेशने झाली त्यात फक्त १४ दिवसांचे कामकाज झाले. याच काळात संसदेच्या अधिवेशनांमध्ये ६९ दिवसांचे कामकाज झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
रस्त्यावर उतरून जनतेसमोर प्रश्न मांडण्याचा इशारा
विविध खात्यांचा भ्रष्टाचार, मराठा आणि ओबीसी आरक्षणासारखे शंभर प्रश्न आहेत. अधिवेशनाला सामोरे जाता येत नाही म्हणूनच त्यापासून पळ काढला जात आहे. विधिमंडळात सदस्यांना बोलूच द्यायचे नाही अशी व्यवस्था उभारली आहे. पण, सभागृहात जे मांडता येणार नाही ते रस्त्यावर उतरून जनतेसमोर मांडू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिला.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य भाजप नेते उपस्थित होते.
शिवसेनेसोबत शत्रुत्व नाही, वैचारिक मतभेद
राजकारणात जर-तरला अर्थ नसतो. जी परिस्थिती निर्माण होते त्यावरून निर्णय घेतले जातात. शिवसेनेसोबत कोणते शत्रुत्व नाही. ज्यांच्या विरोधात लढून विजयी झालो त्यांचाच हात पकडून आमचे मित्र निघून गेले, त्यामुळे वैचारिक मतभेद निर्माण झाले.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा