सावंतवाडी : ‘नक्षत्रांचं देणं’ काव्यमंच्यावतीने सावंतवाडीत २१ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेपाच यावेळेत येथील बॅ. नाथ पै सभागृहात एकदिवसीय राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते व स्वागताध्यक्ष राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नक्षत्रांचं देणं काव्यमंच, पुणेचे संस्थापक राजेंद्र सोनवणे असून यावेळी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, मठाधिपती महंत राजेंद्रभारती महाराज तसेच नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन सावंतवाडी तालुकाध्यक्ष वर्षा परांजपे (तळवणे) करणार आहेत. पहिल्या सत्रात सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत नवोदित कवी, कवयित्री यांची काव्य गायनाची स्पर्धा रंगणार आहे. दुपारी स्नेहभोजनानंतर अन्य कवींच्या काव्य सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश तेंडोलकर करणार आहेत. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक, लेखक, कवी, समीक्षक श्रीराम पचिंद्रे असून या सत्रात मान्यवर आणि सहभागींचे काव्यवाचन होणार आहे. तिसऱ्या सत्रात ४ ते ४.२० या वेळेत ‘कवितेचा आस्वाद कसा घ्यावा’ या विषयावर श्रीराम पचिंद्रे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर हास्यकवी बंड्या जोशी आपल्या हास्यकविता आणि गझल सादर करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता जिल्हास्तरीय स्पर्धेच्या बक्षीस वितरणाने संमेलनाचा समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)मान्यवर कवींची उपस्थितीदुसऱ्या सत्रात गझलसम्राट मधुसूदन नानिवडेकर (वैभववाडी), मंदाकिनी गोडसे (देवगड), कवयित्री सुजाता पेंडसे (कोल्हापूर), उषा परब (सावंतवाडी), प्रवीण बांदेकर (सावंतवाडी), मालवणी कवी दादा मडकईकर (सावंतवाडी), शरयू आसोलकर (कुडाळ) काव्य सादर करणार आहेत.
सावंतवाडीत राज्यस्तरीय महासंमेलन
By admin | Published: December 14, 2014 8:13 PM