मुंबई : महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात वस्तुसंग्रहालय असणे गरजेचे असून, नुकतेच पुरातत्त्व वस्तू व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने एका राज्यस्तरीय वस्तुसंग्रहालयाचा आराखडा तयार केला आहे. त्याविषयी बोलणी चालू आहेत. हे वस्तुसंग्रहालय निर्माण झाल्यानंतर ते राज्यच नाही तर संपूर्ण देशाचे मोठे सांस्कृतिक केंद्र बनेल, असे शासनाच्या राज्य पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे सहायक पुरातत्त्व अभ्यासक डॉ. मयूर ठाकरे यांनी जागतिक वस्तुसंग्रहालय दिनाचे महत्त्व विशद करताना सांगितले.जागतिक वस्तुसंग्रहालय दिन वस्तुसंग्रहालयांचे भविष्य : पुनर्प्रस्थापन आणि पुनर्विचार अशा मध्यवर्ती संकल्पनेवर साजरा होत आहे. याच विषयावर भाष्य करताना मयूर ठाकरे म्हणाले, वस्तुसंग्रहालये केवळ कुतूहलाचा विषय नव्हेत, तर ती आपल्या सांस्कृतिक जडणघडणीचा आलेख आपल्याला दाखवितात. वर्तमान जगात आपण या ऐतिहासिक मूल्यांचा आढावा घेऊन उज्ज्वल भविष्य साकारू शकतो. सध्याच्या काळात प्रत्यक्ष भेटींमधून वस्तुसंग्रहालयांची मिळकत थांबलेली असताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत होत आहे. रचना, आभासी सहली, वर्धित वास्तव अशा स्वरूपात वस्तुसंग्रहालये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.
राज्यातील वस्तुसंग्रहालय आणि त्यामध्ये असणारा खजिना
काळ्या दगडात बांधलेले वस्तुसंग्रहालयकोल्हापूर येथील न्यू पॅलेस म्युझियमचे बांधकाम १८७७-१८८४ च्या दरम्यान करण्यात आले. या संग्रहालयाच्या बांधकामाला त्या काळात सात लाख रुपये खर्च आला. काळ्या दगडात बांधलेले वस्तुसंग्रहालय भारतीय स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना मानले जाते.केळकर यांचे घरपुण्यातील एका लहानशा रस्त्यावर डॉ. डी. जी. केळकर यांचे घर आणि त्यात असंख्य वस्तूंचा खजिना आहे. वस्तुसंग्रहालयात प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन जीवनात वापरल्या गेलेल्या २२ हजार वस्तूंचा संग्रह आहे.
डायनोसॉरचे अवशेषअजब बंगला या नावाने सुप्रसिद्ध असलेले नागपूर येथील सेंट्रल म्युझियम प्राचीनतम वस्तुसंग्रहालयांपैकी एक आहे. १८६३ मध्ये या वस्तुसंग्रहालयाचे बांधकाम करण्यात आले. जैनोसॉरस नावाच्या डायनोसॉरच्या भारतीय प्रजातीचे मध्य प्रदेशातील उत्खननात सापडलेले अवशेषदेखील येथे पाहायला मिळतात.
राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी राजवाडा रत्नागिरीतील थिबा पॅलेस म्युझियमचा विचार करता राजा थिबो, यापूर्वीचा ब्रह्मदेश आणि आताच्या म्यानमार येथील राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी थिबा पॅलेस हा राजवाडा बांधला गेला. पहिल्या महायुद्धातील रणगाडा अहमदनगर येथील कॅव्हलरी टॅंक म्युझियममध्ये रणगाडे, शस्त्रसज्ज गाड्या आदी ५० गाड्या येथे प्रदर्शित केल्या गेल्या आहेत. पहिल्या महायुद्धात वापरलेला मार्क - १ हा रणगाडा येथील मुख्य आकर्षण आहे. भारतीय शैलीची सिल्व्हर घोस्ट रॉल्स रॉईस शस्त्रसज्ज मोटार ही येथील प्राचीनतम वस्तू आहे.