यदु जोशी
मुंबई : लाखो लोकांमध्ये दरदिवशी श्रीमंतीची स्वप्ने पेरणाऱ्या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वाशी; नवी मुंबई येथील कार्यालयाची वीज महावितरणने थकबाकीपोटी कापली असून त्यामुळे सोडतींमध्ये अनंत अडचणी येत आहेत. इन्व्हर्टर लावून खंडित सोडती सुरू करण्याची वेळ आली आहे.
‘महाराष्ट्र राज्य लॉटरी... यश आज नाही तर उद्या’, ही टॅगलाइन आता ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी... सोडत आज नाही तर उद्या’ अशी बदलण्याची वेळ आली आहे. दिलेल्या तारखेनुसार सोडती होत नाहीत, असा अनुभव वारंवार येत आहे. या प्रकारामुळे राज्यभरातील लॉटरीचे एजंट हैराण झाले आहेत. वीज बिलाची रक्कम मिळावी म्हणून वाशीच्या कार्यालयानेच एखादे लॉटरी तिकीट खरेदी करावे, अशी मजेशीर सूचना नांदेडच्या एका एजंटने (पान १ वरुन) ‘लोकमत’शी बोलताना केली. राज्य सरकारला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या लॉटरीची सोडत वाशीतील ज्या कार्यालयात होते, तेथील वीज कनेक्शन तर कापलेच शिवाय टेलिफोन आणि पाणी कनेक्शन बिल न भरल्याने तेही कापण्याच्या नोटीसा आल्या आहेत.
वीज कापल्याने २५ जूनपासून हे कार्यालय अंधारात आहे. लॉटरी ज्या मशीनवर काढल्या जातात, त्या वीज पुरवठ्याअभावी बंद असल्याने सोडतीच होत नव्हत्या. एरवी आठवड्यातून किमान सात सोडती होतात, पण गेल्या एप्रिलपासून सोडती नियमित काढल्या जात नाहीत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे लॉटरी तिकिटांची विक्री कमी झाली आहे. मुंबईतील मुख्य एजंटने १२ ते १८ जुलैपर्यंतच्या सोडतीची तिकिटे अद्याप उचललेली नाहीत.
एजंटने उपलब्ध करून दिले इन्व्हर्टरमुंबईच्या मुख्य एजंटने औदार्य दाखवून इन्व्हर्टर उपलब्ध करून दिले आणि शुक्रवारी ६ जुलैला एकाच दिवशी तब्बल नऊ सोडती काढण्यात आल्या. २ जुलैपासून सोडती बंद होत्या.
वाशीच्या कार्यालयाने पाठविलेला प्रस्ताव आम्ही वित्त विभागाकडे पाठविला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत वीज बिल भरले जाईल आणि सोडती नियमित होतील.संजय गुळेकर, अवर सचिव, महाराष्ट्र राज्य लॉटरी
विजेचे बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन कापले याचा एजंटांशी काही एक संबंध नाही पण राज्यभरातील ५०० एजंटांना त्याचा फटका बसत आहे. इतक्या वर्षांमध्ये असा कटू अनुभव पहिल्यांदाच येत आहे.मनीष खेतान, लॉटरी एजंट, खामगाव, जि. बुलडाणा