पुणे (मंचर) :राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वळसे पाटील यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. आपली प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.उद्या वळसे-पाटील यांचा 64 वा वाढदिवस असून कार्यकर्ते काहीसे चिंतेत पडले आहे.
राज्याचे कामगार व उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. वळसे पाटील आज मंत्रालयात कामासाठी हजर होते. मात्र बैठक सुरू होण्याआधी त्यांना त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे कळले. बैठक सुरू होण्याआधीच ते घरी परतले आहेत.
ट्विटमध्ये म्हटले आहे की, नुकतीच माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. मला कसलाही त्रास होत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोना चाचणी करून घ्यावी असे आव्हान त्यांनी केले आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेसाठी रुजू होईल.असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे
दरम्यान वळसे पाटील यांचा उद्या 64 वा वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा होणार नव्हता. कार्यकर्ते केवळ शुभेच्छा देणार होते. मात्र सकाळी वळसे-पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजताच कार्यकर्ते चिंतेत पडले आहेत. एकमेकांना दूरध्वनी करून वळसे-पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस ते करत होते .वळसे-पाटील लवकर बरे व्हावेत यासाठी समाज माध्यमातून सदिच्छा दिल्या जात आहेत.
एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाला होते हजर...
भाजपा सोडून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला शरद पवारांपासून राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यात दिलीप वळसे पाटीलही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे.
......
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ट्विटवरून दिल्या सदिच्छा...दिलीपराव ,आपण लवकरात लवकर बरे होऊन समाजकारणात सक्रिय व्हाल ह्याची खात्री आहे.आपणास उत्तम निरोगी आयुष्य लाभो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व्यक्त करतो.अशा शब्दात माजी खासदार व शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सदिच्छा दिल्या आहेत.