नागपूर : महाविकास आघाडी सरकार हे इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार आहे. एक हजार कोटींचे दलालीचे रॅकेट या सरकारमध्ये उघडकीस आले आहे. काही मंत्र्यांनी तर फॉलोअपसाठी वसुलीचे सॉफ्टवेअर तयार केले आहे, असा खळबळजनक आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर कदापिही मान्य नाही. तो झाला असता तर आज अर्धे मंत्रिमंडळ जेलमध्ये राहिले असते. सरकार जेव्हा पडेल तेव्हा तुम्हाला कळणारसुद्धा नाही. पण, सरकार पाडणे हे आमच्या अजेंड्यावर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.रावते, देसाई, शिंदेंना मुख्यमंत्री का केले नाही?मुख्यमंत्र्यांनी भाबडेपणाचा मुखवटा आता तरी उतरवला पाहिजे. त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती आणि त्यांनी ती पूर्ण केली. शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचे होते, तर दिवाकर रावते, सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे होते; पण मुख्यमंत्री तर तुम्हालाच व्हायचे होते, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला.ती चीप कोणती आहे?फडणवीस यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, फडणवीसांनी ती चीप कोणती आहे? हे दाखवावं आणि त्यातून कशी वसुली होते, याबाबत सांगावं म्हणजे आमच्याही ज्ञानात भर पडेल.
राज्यातील मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर; देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 6:02 AM