रिसोड : गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिस पाटलाकडे असते. तसेच पोलिस प्रशासन व गावातील नागरिकांमधील दुवा म्हणून पोलिस पाटील मोलाची कामगिरी पार पाडतात. मात्र, ही जबाबदारी पार पाडणारे राज्यातील पोलिसपाटील गेल्या अनेक दिवसांपासून मानधनापासून वंचित आहेत. याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे. शासनाच्या वतीने प्रत्येक गावासाठी एक पोलिसपाटील अशी नियुक्ती केलेली आहे. गावात शांतता राखणे, कायदा-सुव्यवस्थेला अबाधित ठेवणे, गावातील शांततेला बाधा पोहोचविणारी कोणतीही घटना घडली की, पोलिस स्टेशनला ती तात्काळ कळविणे, महत्वाचे सण-उत्सव, यात्रा, निवडणुका आदी काळामध्ये पोलिस पाटलाला अतिशय चौकसपणे राहावे लागते. पोलिस स्टेशनला, ठाणेदाराला अचूक माहिती द्यावी लागते. त्याला पोलिसांप्रमाणे ऑन ड्युटी २४ तास कार्यतत्पर राहावे लागते. या बदल्यात त्यांना मानधनापोटी महिना तीन हजार रुपये देण्यात येतात. ३१ डिसेंबर २0१३ पर्यत पोलिस पाटलांना केवळ ८00 रुपये मानधन दिले जात होते. त्या वाढ होण्यासाठी पोलिसपाटलांच्या अनेक संघटनांनी वारंवार निवेदने देऊन , स्मरणपत्रे दिली होती. त्यामुळे १ जानेवारी २0१३ पासून पोलिस पाटलांना दरमहा तीन हजार रुपयांचे मानधन मंजूर करण्यात आले. राज्यातील सर्व पोलिसपाटलांचे मानधन ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र ती अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. त्यात प्रत्येक पोलिसस्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व पोलिसपाटलांचे मानधन संबंधित ठाणेदाराच्या खात्यात जमा केले जाते. त्यानंतर त्यांच्याकडून ते प्रत्येक पोलिस पाटलाच्या खात्यात जमा केले जाते. दरम्यान सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तीन महिन्यांपासून पोलिस पाटलांना मानधन मिळालेले नाही. काही जिल्ह्यात चार तर काही जिल्ह्यात पाच-सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. वाशिम जिल्ह्यातील पोलिस पाटलांना डिसेंबर २0१३ पासून पोलिस पाटलांना मानधन मिळालेले नाही.
राज्यातील पोलिसपाटील मानधनापासून वंचित
By admin | Published: July 06, 2014 11:11 PM