नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीने पुढचा आठवडा निर्णायक ठरेल. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने १७ मार्चपासून राखून ठेवलेला निकाल येत्या ८ ते १२ मे दरम्यान केव्हाही लागू शकतो. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या या निकालाचे राज्यात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे १४ फेब्रुवारीपासून १२ दिवस सुनावणी झाली. त्यावर घटनापीठाने १६ मार्च रोजी निर्णय राखून ठेवला.
येत्या २० मे पासून सुरू होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या ३ जुलैपर्यंत राहणार आहेत. तत्पूर्वी, या घटनापीठाचे सदस्य असलेले न्या. शहा १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल त्यापूर्वी लागणे अपेक्षित आहे. न्या. शहा यांच्या निवृत्तीपूर्वी १३ आणि १४ मे रोजी न्यायालयाचे कामकाज शनिवार आणि रविवारी बंद राहणार असल्यामुळे निकाल जाहीर करण्यासाठी ८ ते १२ मे हाच कालावधी शिल्लक राहतो.
कर्नाटकनंतरच? कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार ८ मे रोजी संपणार आहे तर मतदान १० मे रोजी होणार आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाचा कर्नाटक निवडणुकीवरील परिणाम टाळायचा झाल्यास ८ ते १० मे दरम्यानच्या काळात निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा नाही. अशा स्थितीत निकाल ११ ते १२ मे या दोन दिवसांत लागू शकतो, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत.