लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस खात्यांतर्गत फौजदार पदासाठीच्या परीक्षेत राज्य लोकसेवा आयोगाने वयोमर्यादेची जुनीच अट कायम ठेऊन पुन्हा चूक केली. अखेर ही चूक तत्काळ सुधारण्याचे आदेश मुंबई ‘मॅट’चे अध्यक्ष अंबादास जोशी आणि उपाध्यक्ष राजीव अगरवाल यांनी गेल्या आठवड्यात आयोगाला दिले आहेत.फौजदार पदासाठी २०१७ ला पुन्हा राज्य लोकसेवा आयोगाने जाहिरात काढली. त्यात पुन्हा जुनीच चूक करताना ३३ व ३८ ही वयोमर्यादा कायम ठेवली आहे. एमपीएससीने केलेल्या या चुकीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावावे लागले आहे.नऊ पोलीस कर्मचाऱ्यांनी मुंबई ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) वयोमर्यादेच्या वादाबाबत याचिका दाखल केली. त्यावर जोशी व अगरवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. सामान्य प्रशासन विभागाच्या २३ एप्रिल २०१६ च्या परिपत्रकानुसार खुल्या प्रवर्गाला २८ ऐवजी ३३ आणि मागासवर्गीयांना ३८ ऐवजी ४३ ही सुधारित वयोमर्यादा लागू करावी, याबाबत राज्य लोकसेवा आयोगाने सुधारणा करावी, असे मौखिक आदेश ‘मॅट’ने दिले आहे. फौजदाराच्या भरती प्रक्रियेला आधीच औरंगाबाद खंडपीठाचा स्थगनादेश असताना पुन्हा स्थगनादेश देण्याची विनंती ‘मॅट’ने फेटाळून लावली. या प्रकरणात आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी काम पाहिले.
राज्य लोकसेवा आयोग पुन्हा चुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 1:40 AM