मुंबई : एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतेवेळी पूर्वीच्या शाळेचा दाखला अनिवार्य करण्याची मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टस् असोसिएशनने (मेस्टा) केली आहे. दरम्यान, मेस्टाचे अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी २८ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या राज्यव्यापी मेळाव्याची घोषणाही केली.तायडे पाटील म्हणाले की, इंग्रजी शाळांना भेडसावणाऱ्या समस्यांचे गांभीर्य राज्य शासनाला कळावे म्हणून राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी राज्यातील १० हजार संस्थाचालक, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पीटीए स्थापन असताना शुल्क विनियमन कायदा रद्द किंवा शिथिल करण्याची मागणी मेस्टाचे मुंबई अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केली. पूर्व प्राथमिक प्रवेशाचा गेल्या चार वर्षांचा फी परवाता अद्याप मिळाला नसल्याने शाळा बंद करण्याची वेळ संस्थाचालकांवर आल्याचेही त्यांनी सांगितले. आरटीई कायद्याप्रमाणे आर्थिक व दुर्बल घटकातील मुलांना साहित्य, पुस्तके व गणवेश शासनाने पुरवण्याची मागणीही त्यांनी केली.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा राज्यव्यापी मेळावा
By admin | Published: November 27, 2015 2:48 AM