जालना: कोरोना लसीकरणासाठी राज्य सज्ज असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपासून राज्यात लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली. त्याची पाहणी करण्यासाठी टोपे जालन्यातील ड्राय रन सुरू असलेल्या केंद्रावर आले होते. सीरमनं तयार केलेली लस देण्यासाठी राज्य तयार असून त्यासाठी ड्रग अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची गरज आहे. ही परवानगी मिळाल्यास प्रशासन लसीकरणासाठी सज्ज असल्याचं टोपे यांनी सांगितलं. लसीकरण केंद्राची रचना मतदान केंद्रासारखीच असेल, अशी माहिती टोपेंनी दिली. 'आपण मतदान करण्यासाठी केंद्रावर जातो, त्यावेळी तिथे आपली पहिली भेट पोलीस कर्मचाऱ्यांशी होते. लसीकरण केंद्रावरदेखील पोलीस असतील. ते ओळखपत्र तपासतील. लसीकरण केंद्रात प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य असेल. त्याशिवाय केंद्रात प्रवेश करता येणार नाही. पोलिसांना ओळखपत्र दाखवल्यानंतर संबंधित व्यक्ती आयडेंडिफिकेशन रुममध्ये जाईल. तिथे शिक्षक किंवा शिक्षिका असतील. ज्यांना लसीकरणासाठी मेसेज पाठवण्यात आला आहे, तीच व्यक्ती केंद्रावर आली आहे का, याची पडताळणी शिक्षक/शिक्षिकेकडून कोविन ऍपच्या माध्यमातून केली जाईल,' असं टोपे म्हणाले.
Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यावर निर्धास्तपणे फिरता येणार?; राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
By कुणाल गवाणकर | Published: January 02, 2021 10:57 AM