मुंबई : आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या आठ दिवसांत राज्य रोष्टर एक करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक आंतरजिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाला सोमवारी दिले. आंतरजिल्हा बदलीसाठी नवीन धोरण आखताना कृती समितीच्या मागण्यांचा विचार करावा, या मागणीसाठी शिक्षकांनी सोमवारी आझाद मैदानात उपोषण केले.कृती समितीचे राज्य अध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेतील शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी अडचणी येत असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही बाब समितीने तावडे यांच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रकरणामध्ये सध्या असलेल्या शासन निर्णयामुळे २० ते २५ हजार शिक्षक १० ते १२ वर्षे बदलीपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तवही त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत चर्चा झाली असून, हा प्रश्न आठ दिवसांत सोडविला जाईल, असे आश्वासन तावडे यांनी कृती समितीला दिले आहे.कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाच्या येऊ घातलेल्या ‘मदत’ प्रणालीमुळे बदलीग्रस्तांचा प्रश्न सुटणार नाही. उलट बदलीची प्रक्रिया रखडणार आहे. शिक्षकांवर एक प्रकारचा अन्याय होणार आहे. आत्तापर्यंत आंतरजिल्हा बदलीग्रस्तांच्या मागणीसाठी ३० आमदारांनी पाठिंबा दिला असून, शासनाला ३ हजार ६३ शिक्षकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन पाठविले आहे. अद्याप याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही. नवीन धोरण आखताना कृती समितीच्या मागण्यांचा विचार करावा, अशी समितीची मागणी आहे. बदली प्रश्न सोडवणारग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बदल्यांसंदर्भात चर्चा झाली असून, हा प्रश्न आठ दिवसांत सोडविला जाईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले.
आठ दिवसांत राज्य रोष्टर एक
By admin | Published: April 12, 2016 3:30 AM