बारामती (जि़ पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी असलेली मैत्री भाजपाच्या मित्र पक्षांना न पेलणारी आहे. चार महिन्यांपूर्वी ‘राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष’ आहे. पवारांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची वेळ आली आहे, अशी टीका करणाऱ्या मोदींना पवारांचा ‘सल्ला’ घेणे भाग पडते, हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांच्या मेळाव्यात पंतप्रधानांनी एफआरपीसाठी काही अनुदान जाहीर केले असते, तर त्याचे शेतकऱ्यांनी कौतुक केले असते. मात्र, गळ्यात गळे घालून मोदी यांनी राजकीय गुलामगिरीला अधिकच बळ दिले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र व राज्यात सरकार आल्यानंतर मनोधैर्य वाढलेल्या भाजपा-शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोदींच्या पवार प्रेमावर कडाडून टीका केली. महाराष्ट्राच्या जनतेचा हा अवमान आहे. जनतेची फसवणूकच करायची होती, तर निवडणुकाच एकत्र लढवायच्या, अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्यात आता सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी आमच्या तयारीवर बोळा फिरविण्याचे काम झाले आहे. शिवसेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीला जवळ करणे, हे राज्यातील जनता मान्य करणार नाही. गुणगान करण्यापेक्षा एफआरपीसाठी अनुदान, ठिबकसाठी अनुदान जाहीर केले असते तर त्याला शेतकऱ्यांनी महत्त्व दिले असते. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घोटाळ्यांच्या चौकशीत या मैत्रीमुळे काही निष्पन्न होणार नाही, अशी भीती शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे म्हणाले, मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. कृषी विकासासाठी दोन मोठे नेते एकत्र आले तर चुकले काय. या भेटीचा अर्थ राजकीय काढू नये. त्याचबरोबर मोदी-पवार भेटीमुळे सध्या सुरू असलेल्या चौकशा थांबणार नाही, अशी कार्यकर्ता म्हणून आपल्याला खात्री आहे. राजकारणात एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी वैयक्तीक संबंध असू शकतात. त्यातूनच या भेटीकडे पहावे, असे मला वाटते. तसाही तो काही राजकीय कार्यक्रम नव्हता. ते का भेटले, हे आपण सांगू शकत नाही. त्यांच्या भेटीची कारणे फक्त त्या दोन नेत्यांनाच माहिती असणार, असे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या एकत्रित कार्यक्रमाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची आवश्यकता नाही. पंतप्रधानांची ती व्यक्तीगत भेट होती. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य ठरणार नाही, असे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी मत व्यक्त केले.
.... ही तर राजकीय गुलामगिरी!
By admin | Published: February 16, 2015 3:12 AM