- यदु जोशी, मुंबई
राज्यात तलाठ्यांची तीन हजार आणि मंडळ अधिकाऱ्यांची सुमारे ५०० पदे टप्प्याटप्प्याने भरण्याच्या महसूल विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक २०० कोटी रुपयांचा बोजा पडणार असला तरी महसुली कामांना गती मिळणार आहे. या बाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येईल, असे सूत्रांनी सांगितले. वर्ग कच्या श्रेणीत येणाऱ्या तलाठ्यांची सध्या राज्यातील संख्या १२ हजार ६३७ इतकी आहे. महसूल विभागाबरोबरच अनेक विभागांची कामे त्यांना करावी लागतात. आजमितीस सरासरी सहा गावांमागे एक तलाठी अशी संख्या आहे. त्यामुळे कामांचा प्रचंड ताण त्यांच्यावर येतो. पदे वाढविण्यासंदर्भात नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी २०१४ मध्ये नेमलेल्या समितीने आॅगस्ट २०१४ मध्ये आपला अहवाल दिला होता आणि ३१०० नवीन पदे निर्माण करण्याची महत्त्वाची शिफारस केली होती. त्या अहवालावरील धूळ आता बाजूला सारत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन हजार पदे भरण्यास मान्यता दिली आहे.महसूलवाढीचे वचन महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या तिजोरीवर या निर्णयाने आर्थिक बोजा पडणार असला तरी पदे वाढल्याने विविध प्रकारची करवसुली करण्यास गती मिळेल आणि शासनाचे उत्पन्न वर्षाकाठी सुमारे ४०० कोटी रुपयांनी वाढेल.