ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - सरकारमधील नेत्यांचे घोटाळे एकामागोमाग एक उघडकीस आल्याने भाजपा अडचणीत सापडलेला असतानाच भाजपा आमदार राज पुरोहित पक्ष नेतृत्वावरच टीका करत असल्याची सीडी प्रसारित झाल्याने भाजपाच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. काही वृत्तवाहिन्यांनी पुरोहित यांचे स्टिंग ऑपरेशनची सीडी प्रसारित केली असून त्यात पुरोहित मोदी सरकारची धोरणे, त्यांनी घेतलेले निर्णय, तसेच मुख्यमंत्री व बिल्डर्सच्या संबंधांवरही टीका करताना दिसत आहेत.
'पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यापारी वर्गाचा मोठा पाठिंबा आहे, मात्र त्यांच्या काही धोरणांमुळे व्यापारी वर्ग दुखावला गेला आहे', असे पुरोहित यांनी म्हटले. यावेळी पुरोहित यांनी मंगलप्रभात लोढा यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. ' लोढा यांनी दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांचा सर्व पैसा लाटला असून ते गब्बर झाले आहेत. लोढा यांनी निवडणुकीत पैसा ओतला, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही 'बोगस नेता' अशी संभावना केली आहे.
मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष असलेल्या पुरोहित यांच्या या वक्तव्यामुळे भाजपामध्ये राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी पुरोहित यांनी अशी काही वादग्रस्त वक्तव्य केली होती.
दरम्यान भाजपाने याप्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून ' पुरोहित यांच्या स्टिंग ऑपरेशनची सीडी पाहून मगच त्यावर निर्णय घेऊ' असे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.