पुणे : राज्याचा पारा ४७ अंशांच्या घरात पोहोचलेला असतानाच पुण्याचे तापमान मात्र ३७ अंशांच्या घरातच स्थिरावले आहे. त्यामुळे राज्य तापलेले असताना पुणे मात्र कूल असल्याचे चित्र सध्या आहे. बुधवारी पुण्याचे कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अवघ्या तीन दिवसांत राज्याचे तापमान ४४ अंशांवरून ४७ अंशांच्या घरात पोहोचले. परंतु, पुण्याचे तापमान ३६ आणि ३७ अंशांच्या घरातच राहिले आहे. पुण्याच्या पाऱ्याने गेल्या आठवडाभरात चाळीशी गाठलेलीच नाही. पुण्याचे तापमान कमी राहण्यामागे ढगाळ हवामान प्रामुख्याने कारणीभूत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान कायम आहे. त्यामुळे शहरातील हवेतील आर्द्रता वाढलेली आहे. त्यामुळे तापमान वाढीस अटकाव बसत आहे. यामुळे पुणेकरांना ऐन मे महिन्यात उन्हाचा जास्त तडाखा सहन करावा लागत नाही. विशेष म्हणजे, पुढील ४-५ दिवसांत राज्याचे तापमान आणखी वाढणार असले, तरी पुण्याचे तापमान ३७ अंशांच्या घरातच कायम राहणार आहे. पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुढील ६ दिवस पुण्याचे तापमान ३६ ते ३७ अंशांच्या घरातच राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांची तीव्र उकाड्यापासून पुढील आठवडाभर तरी सुटका होणार आहे.
राज्य तापले; पुणे मात्र कूल
By admin | Published: May 21, 2015 1:43 AM