अकोला : पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, गुरांच्या चाऱ्याची टंचाई भासणार असल्याने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत राज्यात चारा लागवडीचे नियोजन कृषी विभागाच्या पातळीवर करण्यात येत आहे. मराठवाडा व राज्यातील इतर भागात पाऊसच नसल्याने आताच चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, शासनाने परप्रांतातून चारा आणण्याची तयारी सुरू केली आहे. यावर्षी पावसाने संपूर्ण मराठवाड्याकडे पाठ फिरवली असून, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम विदर्भातील अनेक भागांत पाऊस नसल्याने या भागातील खरीप हंगामातील पिकांसह गुराच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यात चारा लागवड कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. रब्बी हंगामातही चारा लागवड करण्यात येणार असून, चारा बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पंधराशे रुपये अनुदान दिले जाणार आहे.महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फतही वैरण विकास कार्यक्रमावर भर देण्यात येत आहे. मराठवाडा व इतर विभागातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी लगतच्या मध्य प्रदेश व कर्नाटक राज्यातून चारा आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात चाराटंचाई जाणवणार
By admin | Published: August 24, 2015 1:20 AM