अंधश्रद्धा निर्मूलन असो वा जादूटोणाविरोधी कायदा असो. या गोष्टी आहेतच. त्या त्यांच्या स्तरावर उपयोगी ठरतीलच. तशी यंत्रणादेखील आहे. मात्र तेवढ्यानेच समाज अंधश्रद्धामुक्त होणार नाही. त्यासाठी लोकांचे प्रबोधन झाले पाहिजे. ते झाले तरच चित्र बदलेल. आम्ही आणि आमची चळवळ यासाठी कार्यरत आहेच. शिवाय जादूटोणाविरोधी कायदा अंमलबजावणी कक्ष सुरू आहे. जादूटोणा, करणी आणि भानामतीसारख्या अंधश्रद्धाविरोधी प्रवृती कमी करण्यासाठी मोठी यंत्रणा उभी राहत आहे; गावागावांत पोहोचत आहे आणि याच माध्यमातून आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धामुक्त करू, असा निर्धार प्रा. श्याम मानव यांनी ‘लोकमत’च्या कॉफी टेबलमध्ये व्यक्त केला. जग झपाट्याने बदलत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान वेगाने पसरते आहे. पण हा तंत्रज्ञानाचा काळ म्हणजे संक्रमणाचा काळ नाही, तर आपल्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होत असतानाच अंधश्रद्धेविरोधी लढा देणारे विचार गोठले आहेत; ही खंत आहे. अगदी सुरुवातीपासून सांगायचे म्हटले तर जादूटोणाविरोधी कायदा असो अंधश्रद्धाविरोधी चळवळ असो; हे सगळे विषय करण्यापूर्वी मी माझ्या चळवळीची सुरुवात कशी झाली ते विशद करतो. लहानपणापासून चमत्कार करणारे तांत्रिक पाहत होतो. सहाव्या वर्षी मलाच भुताने झपाटल्याचे माझ्या कुटुंबीयांना वाटले आणि ते मांत्रिकाने काढलेदेखील. अगदी १९८० सालापर्यंत मी अंधश्रद्धेचा बळी होतो. जगभर संक्रमणाचा काळ सुरू आहे. तुमच्या कार्यावर याचा काही परिणाम होतो?जग झपाट्याने बदलत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान वेगाने पसरते आहे. पण हा तंत्रज्ञानाचा काळ म्हणजे संक्रमणाचा काळ नाही, तर आपल्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होत असतानाच अंधश्रद्धेविरोधी लढा देणारे विचार गोठले आहेत; ही खंत आहे. अगदी सुरुवातीपासून सांगायचे म्हटले तर जादूटोणाविरोधी कायदा असो अंधश्रद्धाविरोधी चळवळ असो; हे सगळे विषय करण्यापूर्वी मी माझ्या चळवळीची सुरुवात कशी झाली ते विशद करतो. लहानपणापासून चमत्कार करणारे तांत्रिक पाहत होतो. सहाव्या वर्षी मलाच भुताने झपाटल्याचे माझ्या कुटुंबीयांना वाटले आणि ते मांत्रिकाने काढलेदेखील. अगदी १९८० सालापर्यंत मी अंधश्रद्धेचा बळी होतो.चळवळीची पायाभरणी कशी झाली?१९८० सालानंतर माझा जयप्रकाश नारायण यांच्यासह मोठ्या लोकांशी संपर्क आला. समाजवाद्यांसह डाव्या विचारसरणीशी संपर्क आला. आचार्य विनोबा भावे यांच्या संपर्कात मी आलो. दरम्यान, मी १९८० साली किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागलो. येथे किर्लोस्करांचा ६०वा अंक काढण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. यानिमित्ताने किर्लोस्करांचे ६० वर्षांतील अंक वाचून काढले. हे वाचतानाच आचार्य विनोबा भावे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आचार्य अत्रे कळले. डॉ. कौर यांची दोन पुस्तके वाचताना मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली; आणि तोवर विचार प्रक्रियाही सुरू झाली होती. माझ्या विचारांची पायाभरणी झाली होती.समाजाच्या भावनांना कसे हाताळले?विज्ञानाने अनेक संशोधने केली आहेत. त्यात भुताखेतांचा म्हणजेच एका अर्थाने अंधश्रद्धेचा विषय आला आहे आणि येतोच आहे. म्हणून अंधश्रद्धेचे निर्मूलन करायचे म्हणजे प्रथमत: यासाठी चळवळ उभी करणे गरजेचे होते. लोकांच्या भावनांना म्हणजे एका अर्थाने समाजाच्या भावनांना हात घालायचा हे मोठे जिकिरीचे काम असते. खरे म्हणजे ते एक आव्हानच असते. मात्र ते इंद्रधनुष्य पेलले. १९८२ साली आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सुरू केली. मानसशास्त्रावर केलेला अभ्यास या प्रवासात कामी आला. सुरुवातीला कोणते अडथळे आले?आम्ही जेव्हा चळवळ सुरू केली, तेव्हा आम्हाला पहिल्याच प्रकरणात अपयश आले. कालांतराने लक्षात आले की, चळवळ रुजवायची असेल किंवा विकसित करायची असेल तर ‘हिप्नोटिझम’ शिकणे गरजेचे आहे; आणि मी ते शिकलो. मी आवर्जून संत गाडगेबाबा वाचून काढले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधताना चळवळ सुरू झाली. १९८२ साली जेव्हा चळवळ सुरू झाली; तेव्हा ही जगातील पहिली अंधश्रद्धाविरोधी चळवळ होती. चळवळीदरम्यान माझा मानसशास्त्रज्ञानांशीदेखील संबंध येत होता. त्या वेळी त्यांनादेखील भूत आणि भानामतीसारखे प्रकार माहीत नव्हते. म्हणून प्रथमत: त्यांचे प्रशिक्षण सुरू केले. याच कालावधीत मी ‘लोकमत’मध्ये नोकरी करीत होतो. ही चळवळ मोठी करण्यात ‘लोकमत’ने मोठा हातभार लावला.तांत्रिक-मांत्रिक यांचा त्रास झाला?महाराष्ट्रभर अंधश्रद्धेविरोधी चळवळ सुरू झाली तेव्हा व्याख्यानांच्या निमित्ताने मी राज्यभर भ्रमंती केली. व्याख्यानांच्या कार्यक्रमांदरम्यान लोकांना कमीतकमी दुखवत विषयांची मांडणी केली. मात्र हे सगळे करताना दररोज एक चमत्कार करणारा तांत्रिक-मांत्रिक अंगावर यायचा. याच काळातल्या युवा चळवळी मरगळल्या होत्या. आमच्या चळवळीत तरुण होते. मात्र आमची फौज ही बेकारांची होती. तरीही एक सांगू इच्छितो ते म्हणजे चळवळ रुजविताना, तिचा प्रचार आणि प्रसार करताना ३३ वर्षांत आमचा कधी पराभव झाला नाही.माध्यमांचा चळवळीला हातभार लागला?१९९० सालानंतर दूरचित्रवाहिन्या फोफावल्या. दूरचित्रवाहिन्यांहूनदेखील अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कार्यक्रम प्रदर्शित केले जात होते. मात्र तोवर आमच्या चळवळीचा एवढा दबदबा निर्माण झाला होता की, दूरचित्रवाहिन्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कार्यक्रम दाखविणे बंद केले होते. चळवळीची दहशत होती की दबदबा?आम्ही जेव्हा काम सुरू केले, तेव्हा ते चार प्रांतांत सुरू झाले. बाबा आढाव आमचे सल्लागार होते. मुकुंदराव किर्लोस्कर अध्यक्ष होते. आढाव यांनी मला नरेंद्र दाभोळकर यांचे नाव सुचविले. १९८७ साली दाभोळकर आमच्यासोबत आले. मात्र १९९० साली त्यांनी स्वतंत्र काम सुरू केले. त्याचवेळी २६पैकी २२ जिल्ह्यांत काम सुरू झाले होते. ९० साली मात्र मी मुंबईत स्थलांतरित झालो. येथे मी व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम सुरू केले. त्यानंतर चळवळदेखील शिथिल झाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या काळात आम्ही चळवळीची दहशत होती, आहे असे कधीच म्हटले नाही. चळवळ अंधश्रद्धेविरोधी होती की धर्माविरुद्ध?मी कोणत्याही धर्माविरुद्ध बोललो तर दंगली उसळतील, असे लोकांना वाटे. परंतु मी कधीच धर्माविरुद्ध बोललो नाही. जबरदस्तीने कधीच कोणावरही काहीही लादले नाही. एवढेच काय; दर्ग्यामध्ये आंदोलने केली. पोलीस कारवाई केली. पण मुस्लिमांचादेखील विरोध झाला नाही. कारण आमची चळवळ कोणत्याच धर्माविरुद्ध नव्हती तर अंधश्रद्धेविरोधी होती.काही आठवणी ज्या स्मरणात आहेत?नागपूरच्या एका मस्जिदमध्ये दुबईहून आणलेले चारचाँद लावले होते. ते खूप दुरून चमकायचे. हे पाहण्यासाठी येथे गर्दी व्हायची. लोक लांबून यायचे. मात्र या प्रकरणात आम्ही मुस्लिमांना समजावून सांगितले. त्याची कारणे पटवून दिली. त्यांनीही आम्हाला साथ दिली आणि हे सगळे बंद झाले. दुसऱ्या एका प्रकरणात चार परदेशी नागरिकांना अटक केली होती. त्या वेळी एखाद्या देशात धर्मविरोधी कायदा असू शकतो; यावर त्या परदेशी नागरिकांचा विश्वासच बसत नव्हता. आणि तिसरे म्हणजे जामनेरला लतादीदींचा एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमादरम्यान लाईट गेली होती आणि महिलांवर अत्याचार झाले होते. तेव्हापासून तेथे महिला कोणत्याच कार्यक्रमाला बाहेर पडत नव्हत्या. आमच्या कार्यक्रमासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी महिलांना आग्रहपूर्वक बोलावून आणले. या कार्यक्रमाला सातएक हजार लोक होते. त्यात एका मांत्रिकाने माझा आवाज बसवून दाखवेन, असे आव्हान दिले. मात्र माझा आवाज त्याला बसविता आला नाही. त्यानंतर मांत्रिकबाबा आणि त्याच्यापाठोपाठ त्याचे समर्थन करणाऱ्या कीर्तनकाराने गोंधळ घातला. लोक व्यासपीठापर्यंत धावून आले. पण आम्ही परिस्थिती शांतपणे हाताळत मांत्रिकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. गुलाबबाबाविरोधातील अनुभव?गुलाबबाबाच्या विरोधातही मोठे आंदोलन उभारले होते. शंकरराव चव्हाण त्यांचे भक्त होते; आणि त्या वेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. गुलाबबाबाने जाहीर व्याख्यानात मला मारण्यासाठी त्याच्या भक्तांना चिथवले. मग आम्हीही त्यांच्याच परिसरात १० व्याख्यानांचे आयोजन केले. गुलाबबाबाच्या आश्रमातून तीन हजार भक्त मला मारण्याची शपथ घेऊन आले आहेत, म्हणून तुम्ही कार्यक्रम घेऊ नका, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, असे पोलीस सांगत होते. मात्र पूर्वपरवानगी घेतलेली असल्याने आम्ही तो कार्यक्रम घेतलाच. कार्यक्रमाला १० हजार लोक आले होते, पोलीसबळ अवघे ४००. कार्यक्रम सुरू झाला आणि पहिल्या २० मिनिटांत सगळे चिडीचूप झाले. सुरुवातीलाच मी म्हणालो की, गुलाबबाबांच्या भक्तांचा मी आदर करतो, पण बाबांचे चाळे काय असतात, हे माहीत आहे का? असे सांगत त्या बाबाचा पर्दाफाश केला आणि नंतर गुलाबबाबालाच त्या परिसरात फिरणे मुश्कील झाले.जादूटोणाविरोधी कायद्याबाबत काय सांगाल?१६ डिसेंबर २००६ रोजी अंधश्रद्धाविरोधी कायदा संमत झाला. कायद्यात ‘कृती गुन्हेप्राप्त आहे’ हा शब्द राहील, याची काळजी घेतली आणि कृती केंद्रस्थानी आली. कायदा ताकदवान आहे. परंतु प्रचार आणि प्रसार महत्त्वाचा आहे. जादूटोणाविरोधी प्रचार प्रसार समिती असली तरी एकत्र काम करण्याची गरज आहे. आम्ही ‘जादूटोणाविरोधी कायदा आणि विज्ञान’ या विषयावर सभा घेतच आहोत. परंतु प्रत्येकाचे प्रबोधन करायचे आहे. सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून काम सुरू आहे. पोलिसांनीही जादूटोणाविरोधी कायदा अंमलबजावणी कक्ष सुरू केला आहे. जिल्हास्तरावर काम सुरू आहे. मात्र कायदा अभ्यासक्रमात आला पाहिजे. कायदा आणि विज्ञान हे विद्यार्थ्यांपर्यंत आणि ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत पोहोचेल. त्यानंतर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने फुले, शाहू आणि आंबेडकरांचे राज्य बनेल.