मुंबई: पंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला; याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘सरपंच ऑफ द ईअर’चा मान नागपूर जिल्ह्याला ‘लोकमत’च्या सरपंच ऑफ द ईअर या पुरस्काराचा मान नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील शितलवाडी (परसोडा) गावाच्या सरपंच योगिता दिगंबर गायकवाड यांना मिळाला.ना. पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, सरपंचाची व्याख्या आता बदलली आहे. टोपी-पागोटेऐवजी जिन्स पॅन्ट, गॉगल लावून बुलेट चालविणारे सरपंच आले आहेत. या सरपंचांनी आता ग्रामविकासाचीही व्याख्या बदलली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विजय दर्डा यांनी या पुरस्कारामागील संकल्पना विषद केली. ते म्हणाले, ‘लोकमत’तर्फे दिल्या जाणा-या विविध पुरस्कारांच्या श्रृंखलेत सरपंच अवॉर्ड सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो. देश मजबूत व्हायचा असेल तर गाव मजबूत होणे गरजेचे आहे.यावेळी राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट व्हीलेजची आवश्यकता आहे. जिल्हास्तरावर झालेल्या सरपंच पुरस्कार वितरण सोहळ्यात तेथील पालकमंत्र्यांनी पुरस्कारप्राप्त गावांना विशेष निधी दिला. त्या धर्तीवर ग्रामविकास मंत्र्यांनी घोषणा करावी, अशी अपेक्षा दर्डा यांनी व्यक्त केली. त्यांच्या या आवाहनाला पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात लगेच उत्स्फूर्त प्रतिसाद देत राज्यस्तरीय गावांसाठी विशेष निधीची घोषणा केली.
Lokmat Sarpanch Awards 2018- राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 9:32 PM