मुंबई - राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई आपल्या सभांना महाराष्ट्रात मिळत असलेल्या पाठिंबा पाहून सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप पवारांनी केला आहे. मात्र पवारांनी अमित शाह यांच्याविषयी सोलापूरमध्ये केलेल्या वक्तव्यामुळेच ही कारवाई झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच पवारांनी पाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर टीका केली होती. तर अमित शाह यांनी देखील पवारांना लक्ष्य केले होते. पवारांनी काय केलं याचा हिशोब द्यावा, असं आव्हाण अमित शाह यांनी दिले होते.
अमित शाह यांच्या प्रश्नाला सोलापुरातील सभेतून उत्तर देताना पवार म्हणाले होते की, तुरुंगात गेलेल्यांनी आम्हाला सांगू नये, अशी खोचक टीका पवारांनी केली होती. पवारांची ही टीका भाजपच्या जिव्हारी लागल्याचे समजते. त्यातूनच पवारांना इडीची नोटीस मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान पवारांना आलेल्या नोटीसनंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर सोशल मीडियावरही पवार यांच्या चौकशीचीच चर्चा आहे.