मुंबई - औरंगाबादमधील लासूर येथील हायटेक चारा छावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आठ दिवसांतच बंद पडली असल्याची 'लोकमत'च्या बातमीची विधानपरिषदेत दखल घेण्यात आली आहे. विधानपरिषदेत चारा छावणीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी औरंगाबादमधील बंद पडलेल्या हायटेक चारा छावणीचा विशेष उल्लेख केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर येथील हायटेक छावणी म्हणून गौरविण्यात आलेली आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेली चारा छावणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अवघ्या आठ दिवसांतच बंद पडली असल्याची बातमी लोकमत (ऑनलाइन) वर प्रसिध्द करण्यात आली होती. विधानपरिषदेत धनंजय मुंडेंनी या बातमीवरून सरकारचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री यांनी औरंगाबादच्या हायटेक चारा छावणीला भेट दिल्यांनतर अवघ्या काही दिवसात छावणी बंद करण्यात आली, सरकारचा हा फक्त देखावा असल्याचे मुंडे म्हणाले.
लासूर येथे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब आणि बजाज ऑटो, भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने लासूर येथे चारा छावणी सुरु करण्यात आली होती. राज्यात सुरु असलेल्या चार छावण्यांपैकी सर्वात मोठी चारा छावणीच्या यादीत लासुरच्या छावणीचा उल्लेख होता. तसेच राज्यातील सर्वात हायटेक चारा छावणी म्हणून सुद्धा या छावणीला गौरविण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अचानक ही चारा छावणी बंद झाल्याने मोठी चर्चा झाली होती.
शेतकऱ्यांनी केले होते आरोप
मी बाभूळगाव येथील शेतकरी असून , माझे दहा जनावरे आहेत मात्र चारा छावणी चालकांनी घरी घेऊन जाण्याचे सांगितले. चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. थोडेफार पैसे होते, मात्र ते बियाणे घेण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे आठ दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. असे लक्ष्मण सोनवणे म्हणाले.
आरोप खोटे आहे : प्रशांत बंब(भाजप आमदार)
मागील तीन महिने आम्ही ६ हजारपेक्षा अधिक जनावरांना छावणीत चारा-पाणी पुरवले. एवढच नाही तर, शेतकऱ्यांची जेवण्याची आणि राहण्याची सोय करण्यात आली होती. मात्र, ग्रामीण भागात मशागती सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी स्वता;हून आपली जनावरे घरी घेऊन गेले. चांगला पाऊस पडेपर्यंत छावणी सुरु ठेवण्याचे आमचे नियोजन होते. शेतकऱ्यांशी चर्चा करून आणि त्यांच्या मागणीनुसारच छावणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्यावर होत असलेले सर्व आरोप खोटे असल्याचे बंब म्हणाले.