ऑनलाइन लोकमत
पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली, दि. 4 - १९६५ची लढाई झाली, ७१चे युद्ध झाले, कारगील घडले. भारतीय लष्कराने प्रत्येकवेळी सडेतोड उत्तर दिले. परंतु भारतावर वाईट नजर ठेवणाºया शत्रूंचा धोका अद्याप संपलेला नाही. सीमेवर तैनात भारतीय लष्कर असो की सीमेआत सुरक्षा सांभाळणारे पोलीस. प्रत्येकांसाठी रात्रंदिन युद्वाचा प्रसंग अजूनही कायमच आहे, अशी भावना माजी लष्करी अधिकाºयांनी व्यक्त केली. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘युद्धस्थ कथा’ या प्रत्यक्ष रणभूमीवरील अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या चर्चेत निवृत्त मेजर जनरल शशीकांत पित्रे, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, निवृत्त कर्नल अभय पटवर्धन व कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील सहभागी झाले होते. युद्धकाळातील आपले अनुभव सांगताना निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, भारतीय सेनेने आपल्या पराक्रमाने जगाला आपल्या क्षमतेची ओळख करून दिली. भारताचा सैनिक म्हणून मला हे युद्ध अनुभवता आले त्याचा मला सार्थ अभिमान आहे. केवळ १४ दिवसात आम्ही शत्रूला पाणी पाजले.
परंतु नंतर घडलेल्या कारगील युद्धाची स्थिती फार वेगळी होती. शत्रू वर होता त्यामुळे भारताला मोठे नुकसान सहन करावे लागले. परंतु भारतीय वायूसेनेने आॅपरेशन सफेद सागरचे योग्य नियोजन करून अचूक बॉम्बहल्ले केले आणि शत्रूला शस्त्र टाकावे लागले. निवृत्त मेजर जनरल शशीकांत पित्रे म्हणाले, लष्कर युद्धाचे सर्व नियोजन करून मैदानात जात असते. परंतु शत्रू आणि निसर्ग दोघेही त्या ल्ष्कराला नियोजनाप्रमाणे युद्ध लढू देत नाहीत. पित्रे यांनी युद्धावर लिहिलेल्या. एका पुस्तकात त्यांनी शहीद झालेल्या पाकिस्तानी सैनिकाचे कौतुक केले आहे, हे कसे असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, शत्रू जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत तो शत्रू असतो. तो ठार झाला तर तो युद्धातला शहीद ठरतो.
तो आपला शत्रू असला तरी त्याच्या देशासाठी लढताना शहीद झालेला असतो. योद्धाला कधीही भौगोलिक सीमा नसतात, अशा शब्दात त्यांनी ती भूमिका कशी योग्य होती ते सांगितले. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी आॅपरेशन ब्लू स्टारचा थरारक अनुभव कथन केला. ते म्हणाले, हे आॅपरेशन फार कठीण काम होते कारण ते देशाच्या आत आणि पवित्र सुवर्ण मंदिरात करायचे होते. समोर शत्रू म्हणून उभा ठाकलेला नाविरसिंग एकेकाळी भारतीय लष्कराचा प्रशिक्षक होता. त्यामुळे त्याला लष्कराचे डावपेच माहीत होते. परंतु भारतीय लष्कराने या आॅपरेशनमध्ये अलौकिक पराक्रम गाजवित मंदिराला मुक्त केले.
अन जेवण सोडून बंदूक हातात घेतली
२६/११ ची ती काळरात्र अजूनही डोळयापुढून पुढे सरकत नाही. मी नुकताच जेवायला बसलो होतो. हल्ल्याची बातमी कळली आणि जेवण सोडून पिस्टल घेत घराबाहेर पडलो, असा थरारक अनुभव कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ९.४० ला अतिरेकी हल्ला झाला आणि ९.५१ला मी हॉटेल ताजमध्ये होतो. हेमंत करकरेंपासून हवालदार ओंबळेपर्यंत सर्वच जण हातात असेल त्या शस्त्रासह अतिरेक्यांशह लढत होतो. प्रसंग कठीण होता. परंतु पोलिसांचे योग्य नियोजन व धैर्याच्या बळावर आम्ही चारही अतिरेक्यांना यमसदनी धाडले. असे बाहेरचे हल्ले सुरू असतानाच देशात सामाजिक सलोखा व सुरक्षितता सांभाळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्या प्रयत्नात मी पोलिस खात्याच्या चौकटी बाहेर काही उपक्रम राबवित आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणपती उत्सवातील डॉल्बी साऊंडचा आवाज कमी झाला आहे. निर्भया उपक्रमाने महिलांना सुरक्षित वाटायला लागले आहे. प्रत्येक वाईट गोष्टीचा पराभव दंडुक्याच्या बळावर होऊ शकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.