पुणे : उसाची रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्यासाठी साखर उतारा हा एक महत्त्वाचे प्रमाण मानले जाते. मात्र, राज्यातील तब्बल ५९ साखर कारखान्यांची साखर उताऱ्याची सरासरी दहा टक्के देखील नाही. त्यातील ११ कारखान्यांना तर नऊ टक्के देखील सरासरी गाठता आली नाही. त्यामुळे या कारखान्यांना एफआरपीचा टक्का गाठताना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचे साखर क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. राज्यातील १०१ सहकारी आणि ९२ खासगी असे १९३ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सिद्धनाथ नगर, फॅबटेक शुगर्स, नाशिकचा केजीएस शुगर आणि हिंगोलीचा शिऊर कारखान्याचे धुराडे बंद झाले आहे. तर, १५ फेब्रुवारी अखेरीस ७५७.२८ लाख टन ऊस गाळपातून ८२ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. राज्याचा सरासरी उतारा हा १०.९६ टक्के इतका आहे. यंदाच्या हंगामात देशात ३०७ लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज असून, राज्यात ९५ लाख टन साखर उत्पादित होईल. पाठोपाठच्या वर्षी देशात भरघोस साखर उत्पादित होणार असल्याने साखरेला सध्या भाव नाही. केंद्र सरकारने १० टक्के साखर उताऱ्यासाठी २७५० रुपये प्रतिक्विंटलचा दर जाहीर केला आहे. तर, त्या पुढील प्रत्येक टक्क्यासाठी २७५ रुपये देण्यात येणार आहेत. हंगाम अखेरीस राज्याचा सरासरी साखर उतारा ११ टक्के इतका आहे. त्यामुळे सरासरी एफआरपी देखील ३ हजार रुपयांच्या आसपास जाते. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने साखरेची किमान आधारभूत किंमत २९०० रुपयांवरुन ३१०० रुपये प्रतिक्विंटल केली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा कारखान्यांना मिळेल. साखर उतारा सरसरी ८ ते ९ टक्के आणि ९ ते १० टक्क्यांदरम्यान असलेल्या कारखान्यांना एफआरपीचा आकडा गाठण्यासाठी अधिक कसरत करावी लागेल. तर, ८ ते साडेआठ टक्के साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांना तर प्रसंगी तोटाही होऊ शकतो असे साखर क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. -------------------सरासरी साखर उतारा ९ टक्क्यांखालील असलेले कारखाने
कारखाना टक्कामाणगंगा-सांगली ३.६७लोकमंगल अॅग्रो-सोलापूर ८.३४लोकमंगल शुगर-सोलापूर ८.२३साईकृपा-२ अहमदनगर ७.७४केजीएस शुगर-नाशिक ८.६८अंबाजी (बेलगंगा)-जळगाव ३.७४लोकमंगल माऊली-उस्मानाबाद ८.३६जयलक्ष्मी शुगर्स-उस्मानाबाद ८.०५साईबाबा-लातूर ८.८६सागर वाईन-यवतमाळ ८.०२महात्मा-वर्धा ८.९१