- हितेन नाईक, पालघरआरक्षण, कोपर्डीमध्ये अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा, अॅट्रॉसिटीचा गैरवापर टाळावा आदी मागण्यांसाठी रविवारी येथे निघणाऱ्या मराठा समाजाच्या मूक मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगरी, आदिवासी, शिलोत्तरी, मच्छीमार, मुस्लीम आदी समाजांचे प्राबल्य असलेल्या या जिल्ह्यातही, मराठा बांधव विक्रमी मोर्चा काढण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करीत आहेत. दुपारी १ वाजता स.तु. कदम हायस्कूलच्या मैदानावरून सुरू होणारा मोर्चा दुपारी ३ च्या सुमारास आर्यन विद्यालयाच्या मैदानावर पोहोचणार आहे. एक लाखांची क्षमता असणारे हे मैदान व आसपासचा परिसरही हा मोर्चा व्यापून टाकेल, अशी शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे.या मोर्चाला आगरी समाज, मुस्लीम समाज यांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय शिवसेना, बहुजन विकास आघाडी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. सकाळी ९ पासूनच संपूर्ण जिल्ह्यातून व आसपासच्या परिसरातून हजारोंच्या संख्येने समाजबांधव स.तु. कदम विद्यालयाच्या प्रांगणात जमण्यास सुरुवात होणार आहे. मोर्चा सुरू होईपर्यंत काही वक्ते या समुदायासमोर मराठेशाहीच्या गौरवशाली इतिहासावर भाषणे करणार आहेत. यातील वक्ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज व अन्य ऐतिहासिक विषयांवर अल्प काळ आपले विचार मांडतील. वक्ते व यांच्या भाषणाचा विषय याची पूर्णपणे खातरजमा करून त्यांची वेळ संयोजकांनी निश्चित केली आहे. यात कोणताही वक्ता राजकीय भाषणे, आरोप, प्रत्यारोप, टीका, टिप्पणी करणार नाही, याची खबरदारी घेतली गेली आहे.या जिल्ह्यात सर्व समाज संघटित आहेत, त्यांची भवने, कार्यालये आहेत. त्यांची संघटनशक्ती त्यांना माहीत आहे, परंतु या जिल्ह्यातील मराठा समाजाची संघटनशक्ती या मोर्चाच्या रूपाने प्रथमच दिसून येणार आहे.अशी असणार आहे व्यवस्थामोर्चाच्या अग्रभागी निवेदन देणाऱ्या पाच मुली, ते निवेदन देऊन येईपर्यंत मोर्चापुढे भाषण करणाऱ्या पाच अन्य युवती, त्यामागे माता, भगिनी, नंतर विद्यार्थिनी, मग थोड्या अंतरानंतर मुले, मग पुरुष बांधव अशी रचना असणार आहे. सर्वांत शेवटच्या रांगेत संयोजक व समाजातील मान्यवर मंडळी असणार आहेत. आर्यन हायस्कूल मैदानात २० बाय १५ फु टांचे आणि १५ फूट उंचीचे छोटेखानी स्टेज उभारण्यात आले असून, त्यावरून पाच युवती भाषण करणार आहेत. कोणताही वक्ता राजकीय भाषणे, आरोप, प्रत्यारोप, टीका, टिप्पणी करणार नाही, याची खबरदारी घेतली गेली आहे.
पालघरमधील मराठा एल्गाराकडे राज्याचे लक्ष
By admin | Published: October 23, 2016 1:37 AM