मुंबई : देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळले आणि सर्वाधिक मृत्यू झाले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील वक्तव्यावरून काँग्रेसने राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर शिवसेनेचे संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये प्रेते नव्हती, गंगेत दिसली असे म्हणत पंतप्रधानांंवर निशाणा साधला होता. त्याला चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, एका चितेवर २४ मृतदेहांचे दहन केले, एका रुग्णवाहिकेतून २० मृतदेह नेले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. कोरोनाच्या लाटेत परप्रांतीय मजुरांना भरवसा देण्यात राज्याचे सरकार कमी पडले व त्यामुळे त्यांनी पलायन केले, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. या सर्वांचा जाब खरे तर काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना विचारायला हवा होता. त्यांच्याकडे माफीची मागणी करायला हवी होती, असे पाटील म्हणाले.भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला सहजासहजी घेणार नसल्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला. रोज उठून धमक्या देण्याचे काम राऊत यांनी बंद करावे. सोमय्या, देवेंद्र फडणवीस, पाटील हे केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करतायत असे वाटत असेल तर तुम्हालाही न्यायालयात जायचा अधिकार आहे, असे पाटील म्हणाले.
काय बोलतो याचे भान बाळगा : अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आरोप -प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. आपण काय बोलतो याचे भान बाळगले पाहिजे, उचलली जीभ लावली टाळ्याला असे चालत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी पाटील यांना उत्तर दिले. अजित पवार यांनी लोकांचे पैसे आणि जमिनी लाटण्याचे काम केल्याचा आरोप पाटील यांनी अलीकडेच केला होता.