हितेन नाईक/आरिफ पटेल, लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/मनोर: राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला असून, पालघरमध्ये उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानामुळे पारा चाळिशी पार गेला आहे. या वाढत्या तापमानाचा बळी पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील १६ वर्षीय विद्यार्थिनी अश्विनी विनोद रावते ठरली आहे. केव (वेडगेपाडा) येथे राहणारी अश्विनी रावते एस. पी. मराठी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मनोर येथे अकरावीच्या वर्गात शिकत होती. सोमवारी अकरावीच्या परीक्षेचा पेपर देऊन अश्विनी घरी आली. घरी आई-वडील नसल्याने ती शेतावर गेली.
मात्र, शेतावरही आई-वडील न दिसल्याने ती पुन्हा घराकडे निघत होती. तेव्हा भोवळ येऊन शेतातच कोसळली. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेली अश्विनीची आई घरी आल्यानंतर तिला अश्विनीची बॅग दिसली. मात्र, अश्विनी न दिसल्यामुळे आई तिच्या शोधासाठी बाहेर पडली. त्यावेळी अश्विनी शेतामध्ये बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आल्यानंतर तिने तत्काळ मदतीसाठी लोकांना बोलवून घेतले. अश्विनीला उपचारासाठी मनोर येथील खासगी रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाढलेल्या तापमानामुळे उष्माघाताने तिचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. अश्विनीच्या अंगावर कुठेही जखमा किंवा साप चावल्याचे व्रण नव्हते. बेशुद्ध अवस्थेत ती दोन तास कडाक्याच्या उन्हात पडून राहिल्याने तिचा मृत्यू झाला आहे, असे तिच्या एका नातेवाइकाने ‘लोकमत’ला सांगितले.
शाळांना सुट्टी जाहीर करातापमानाचा वाढता पारा लक्षात घेता शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. सरकारने हस्तक्षेप करावा असेही ते म्हणाले. उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने अगोदर का नोंदविली नाही, असा सवाल त्यांनी केला. गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण भागात दिवसाचे सरासरी तापमान जवळपास ४० अंशांपर्यंत गेले आहे. शिक्षण विभागाकडून अहवाल मागविण्यात आला असून शिक्षण आयुक्त यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करतील, असे मनसेचे चेतन पेडणेकर म्हणाले.
मुंबईपेक्षा ठाणे ‘हॉट’मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेने कहर केला असून, मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान ३९.७ अंश सेल्सिअस, तर ठाण्याचे ४२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. चालू हंगामातील कमाल तापमानाचा मुंबईतील हा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. बुधवारीही उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.