लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा जाहीर केली आहे.या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी दर्जेदार छायाचित्र पाठविण्याचे आवाहन महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे २५ हजार रुपये, २0 हजार रुपये, १५ हजार रुपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या छायाचित्रकारांनी maha.photo01@gmail.com या ई-मेलवर १५ जुलै २०१७ पर्यंत छायाचित्रे पाठवावीत. ही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाइल नंबर, छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे, याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ही छायाचित्र १८ बाय ३० इंच एचडी (हाय रिझॉल्युशन)ची असावीत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून सादर होणाऱ्या छायाचित्रांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हक्क राहतील. राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याचे वैभव कॅमेऱ्यात करा बंदिस्त
By admin | Published: June 25, 2017 3:36 AM