मुंबई : वाहननिर्मितीसाठी महाराष्ट्र हीच वाहन कंपन्यांची पसंतीची जागा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून टाटा, महिंद्रा, बजाज, फॉक्सवॅगन या चार अग्रगण्य कंपन्यांनी गुरुवारी राज्य सरकारसोबत ११ हजार ५१० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करत या पसंतीवर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र यांनी या कंपन्यांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. राज्य सरकारने २००५मध्ये जाहीर केलेल्या ‘इंडस्ट्रीयल मेगा प्रॉजेक्ट’ धोरणांतर्गत ही गुंतवणूक झाली असून, चार उद्योगांपैकी तीन पुणे जिल्ह्यात तर एक औरंगाबाद येथील वळूज येथे साकारला जाईल. या चारही प्रकल्पांतर्गत ६२७० इतका नवा रोजगार उपलब्ध होणार आहे. यापैकी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रातर्फे चाकण येथील प्रकल्पाचा विस्तार होणार असून, याकरिता ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यातून अडीच हजार लोकांना रोजगार मिळेल. टाटा मोटर्सतर्फेही ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करीत प्रकल्पविस्तार होईल. यात १२०० लोकांना रोजगार प्राप्त होईल. फॉक्सवॅगन कंपनी चाकण येथे डिझेल इंजिनच्या उत्पादनाची सुरुवात करणार असून, याकरिता १५१० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. याअंतर्गत ५७० लोकांना रोजगार मिळेल तर बजाज आॅटोतर्फे दोन टप्प्यांत विस्तार करण्यात येणार असून, याकरिता २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यात २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होतानाच दोन हजार नवा रोजगार निर्माण होईल. हा विस्तार प्रकल्प वळूज येथे होईल. (प्रतिनिधी)
वाहन उद्योगात राज्याचा टॉप गियर
By admin | Published: August 29, 2014 3:41 AM