मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग जसाच्या तसा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करावा, महागाई भत्त्याची थकबाकी त्वरीत मिळावी, सर्व खात्यातील रिक्त पदे तातडीने भरावीत, निवृत्तीचे वय ६0 वर्षे करावे. पाच दिवसांचा आठवडा, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बाल संगोपन रजा मिळावी, अनुकंपा भरती विनाअट करावी. नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागण्यांसाठी राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आदेशाने काल संतप्त निदर्शने केली.मुंबई मंत्रालयासह विक्रीकर भवन, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, शासकीय परिवहन कार्यालये, सर्व शासकीय रूग्णालय, तंत्रशिक्षण विभाग कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, मत्स्यालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय, प्रशासकीय इमारत वांद्रे, कला संचालनालय, अधिदान व लेखा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रूग्णालये, शासकीय दुग्धशाळा आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांनी दुपारी भोजनाच्या सुट्टीत ही निदर्शने केली.मंत्रालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्ता कुंभार, गंगाधर ंमळीक आणि सरचिटणीस रमेश पवार यांनी शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ चर्चा करावी, अशी मागणी केली. या निदर्शनांना मुंबई तसेच सर्व जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याची माहिती मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस सुनील जोशी यांनी दिली. (प्रतिनिधी)
सरकारी कर्मचाऱ्यांची राज्यभर निदर्शने
By admin | Published: February 11, 2016 1:31 AM