अकोला: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यभरात ‘येलो लाइन’ मोहीम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच होणार होता, मात्र कोविडमुळे तो रखडला होता. दिवाळीनंतर शाळा सुरू होणार असल्याचे संकेत असल्याने राज्यभरात या मोहिमेच्या तयारीला सुरुवत करण्यात आली आहे. या अंतर्गत शाळेच्या शंभर यार्ड परिसरातील मुख्य रस्त्यावर ‘येलो लाइन’ रेखाटण्यात येणार असून, त्यासाठी शाळांची निवड केली जात असल्याची माहिती आहे. राज्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्याच्या उद्देशाने चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच ‘येलो लाइन’ची संकल्पना राबविण्यात येणार होती, परंतु यंदा कोरोनामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ही मोहीम मागे पडली होती. दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू होण्याचे चिन्ह दिसू लागल्याने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘येलो लाइन’ मोहीम पुन्हा हाती घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्यभरात तयारीला सुरुवात करण्यात आली असून, जिल्हानिहाय शाळा निवडण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत निवडलेल्या शाळांच्या १०० यार्ड परिसरातील मुख्य रस्त्यावर पिवळ्या रंगाची रेषा रेखाटण्यात येणार आहे.
असा असेल ‘येलो लाइन’उपक्रम
तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने शाळेपासून १०० यार्डच्या परिसरात असल्यास ती दुकाने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षातर्फे संबंधित शैक्षणिक संस्था, स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या मदतीने हटविण्यात येतील.
शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांमार्फत शाळेच्या १०० यार्ड परिसरात ‘तंबाखूमुक्त शाळा’ असे रस्त्यावर पिवळ्या रंगामध्ये लिहिण्यात येईल. यासोबतच परिसरात तंबाखूमुक्त शाळा व जनजागृतीसंदर्भात फलक लावण्यात येईल.
अकोल्यात ७५ शाळांची निवड
- येलो लाइन उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ७५ शाळांची निवड करण्यात आली आहे.
- यामध्ये प्रत्येक तालुक्यातील १०, तर अकोला शहरातील १५ शाळांचा समावेश आहे.
- शाळा, महाविद्यालय परिसरात चित्रांच्या माध्यमातून होणार जनजागृती.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘येलो लाइन’ मोहीम राबविली जाणार आहे. राज्यभरात जिल्हास्तरावर या उपक्रमाची तयारी केली जात असून, शाळा सुरू होताच मोहीम प्रत्यक्षातत राबविली जाणार आहे.
- निखील पाटील, राज्य कार्यक्रम अधिकारी, एनसीडी