मनीषा म्हात्रे / मुंबईपोलीस दलातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला लाचखोरी प्रकरणात अडकविल्याच्या रागातून गेल्या १२ वर्षांपासून मुंबई पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मागे वरिष्ठांचे शुक्लकाष्ट लागले आहे. वरिष्ठांनी आपली वर्दी वाचविण्यासोबतच अधिकारांचा गैरवापर करत या कर्मचाऱ्याला धडा शिकविण्यासाठी बऱ्याच खोट्या शकली लढविल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्याकडून सुरू असलेल्या या त्रासाचा कळस म्हणजे निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या नावाने शिपायाच्या गैरहजेरीबाबत पोलीस डायरीत नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठांचे हे पितळ उघडे करण्यासाठी या कर्मचाऱ्याने नव्याने लढा सुरू करत न्यायासाठी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे.टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी काम करत असताना तुकाराम अल्हाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने १९९६मध्ये निधन झाले. त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर मुलगा अमित याची भरती होऊन मोटार परिवहन विभाग, नागपाडा येथे नोकरी मिळाली. १९९९पासून तो सिव्हिल क्लीनर म्हणून नागपाडा परिवहन विभागात रुजू झाला. बिले पास करून घेण्यासाठी वरिष्ठ त्याच्याकडून दरमहा ५०० रुपयांची लाच घेत होते. महिना वेतन २७०० रुपये त्यात ५०० रुपयांची लाच वरिष्ठांना देणे अमितला खटकत होते. त्याने तक्रार दिल्याने संबधित अधिकारी अडकला. त्याच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल झाले. मात्र याचाच राग मनात धरत अन्य वरिष्ठांनी त्याला धारेवर धरले. अंतर्गत सुरू असलेल्या त्रासामुळे अमितचे मानसिक संतुलन ढासळले. त्याच्यावर चौकशीचा ससेमिरा लावला. न्यायासाठी अमितने मॅटसह उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र पुराव्यांअभावी त्याच्या बाजूने निकाल लागला नाही. अखेर २०१३मध्ये त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
निवृत्त अधिकाऱ्याने बनविली स्टेशन डायरी
By admin | Published: January 24, 2017 4:29 AM