राज्यभरात आंदोलन करणार! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 03:41 PM2024-08-26T15:41:19+5:302024-08-26T15:55:27+5:30

सिंधुदुर्ग - मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Rajkot Fort collapsed; Opponent aggressive | राज्यभरात आंदोलन करणार! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं विरोधक आक्रमक

राज्यभरात आंदोलन करणार! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं विरोधक आक्रमक

सिंधुदुर्ग - मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होते. हा पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमी उद्विग्न झाले आहेत. पुतळा कोसळण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून हा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र वर्षभरातच हा पुतळा कोसळला आहे. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. हा पुतळा कोसळण्यामागे कारण काय हे अद्याप कुणी प्रशासकीय अधिकारी सांगत नाही. 

ठाकरे गट आक्रमक 

"या पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. आता सरकार ही जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतील. या पुतळ्यासाठी सरकारने खर्च केला आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, नाहीतर शिवप्रेमी म्हणून फक्त जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात आम्ही आंदोलन करणार आहोत", अशी भूमिका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी घेतली. 

दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आणि मते घेतली, पण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. निकृष्ट बांधकामामुळे राजकोट किनाऱ्यावरील पुतळा कोसळला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या या लोकांना महाराष्ट्राची जनता कदापी माफ करणार नाही, असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे. 

या घटनेची चौकशी होईल - मंत्री दीपक केसरकर 

"मला या घटनेची माहिती नाही. जर हे घडलं असेल तर अतिशय दुर्दैवी आहे. आमचे पालकमंत्री हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असल्याने ते या सर्व प्रकाराची चौकशी करतील याची खात्री आहे. चौकशी होईलच परंतु हा पुतळा त्वरित उभा करण्यास प्राधान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला समुद्री किल्ला बांधला तिथे हा पुतळा आहे. त्यामुळे याला भावनिक महत्त्व आहे. त्यासाठी जे काही तातडीने करायला हवं ते आमचे सरकार करेल, अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकरांनी दिली. 
 

Web Title: Statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Rajkot Fort collapsed; Opponent aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.